महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे
उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा जि. बुलढाणा येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले प्रेरणादायी मार्गदर्शन सत्र अतिशय यशस्वीरीत्या पार पडले. या सत्रासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी प्रमुख उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधत महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सत्रात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यसनमुक्ती, आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर प्रभावी विचार मांडले.
स्पर्धा परीक्षा करत असताना विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न, नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश निश्चित मिळवता येते, असे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचे व्यसन हे आयुष्याचे नुकसान करून भविष्य अंध:कारमय करते. त्यामुळे विद्यार्थी जीवनात शिस्त, सकारात्मकता आणि व्यसनमुक्त राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. टीझिंग व सामाजिक जबाबदारी याबद्दल बोलताना आजच्या तरुणाईने आदर, सन्मान आणि जबाबदारीची जाणीव ठेवून वागल्यास समाज अधिक सक्षम आणि सुरक्षित बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालय परिवाराकडून मनीषा कदम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना जीवनाच्या योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी व आयुष्यातील यशस्वी प्रवासाची सुरुवात करण्यासाठी अश्याप्रकारचे मार्गदर्शन सत्र अत्यंत महत्त्वाचे असतात असे सांगितले.तसेच यातून विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह आत्मविश्वास व स्वप्नपूर्तीची जिद्द निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षकवृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.