ताज्या घडामोडी

शिवभोजन चालकाकडून शासनाची फसवणूक – केंद्र बंद भोजन बिल सुरूच

दोषींवर होतेय थातूरमातूर कारवाई - अधिकारी व केंद्र चालकांचे साटेलोटे असल्याचा संशय

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कष्टकरी लोकांना अल्प दरात सकस व उत्कृष्ट आहार मिळावा ह्या उद्देशाने राज्यभर शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. ह्या केंद्रात केवळ दहा रुपयांत वरण, भात, भाजी व दोन पोळ्या देण्याचा नियम असुन शासन शहरी व ग्रामीण केंद्र चालकांना अनुदानित रक्कम अदा करत असते. ह्या केंद्रांत दररोज ठराविक थाळ्या देण्याचा नियम आहे. केंद्र चालकांना भोजन देण्याच्या वेळा निर्धारित करून देण्यात आल्या असुन प्रत्येक केंद्रात स्वतंत्र स्वयंपाकगृह, एकावेळी कमीतकमी 25 लोकांच्या बसण्याची सुविधा असणे तसेच त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे भोजन देण्यापूर्वी प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र घेऊन ते ए इ पी डी एस यंत्रणेत लॉगिन करून अपलोड करणे अनिवार्य असते.

मात्र जिल्ह्यात ह्या नियमांची खुलेआम पायमल्ली सुरू असल्याचे चित्र असुन कित्येक केंद्रांवर नियमानुसार अनिवार्य असलेली 25 लोकांची एकाचवेळी बसुन भोजन घेण्याची सुविधा नाही, कित्येक ठिकाणी केंद्रावर स्वयंपाकगृह नाही तसेच बऱ्याच ठिकाणी केंद्र बंद असुनही शासनाला बंद काळातील बिल सादर करून शासकीय अनुदान लाटण्याचे गंभीर प्रकार घडत असूनही अधिकाऱ्यांचे ह्याकडे जाणीवपूर्वक अर्थपुर्ण दुर्लक्ष सुरू असल्याचे दिसुन येते.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे हर्षा दुधे ह्या पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक भूमिकेमुळे केंद्र बंद असतानाही देयक सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले असले तरीही त्या केंद्र चालकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या जुजबी कारवाईमुळे ह्या सर्व प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार भद्रावती येथे  साधु बहुउद्देशीय संस्थेला शिवभोजन केंद्र चालविण्याची परवानगी मिळाली असुन राहुल सदाशिव सोनटक्के हे ते केंद्र चालवित आहे. पुरवठा निरीक्षक हर्षा दुधे ह्या दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12:51  वाजता साधु बहुउद्देशीय संस्था, शिवभोजन केंद्र येथे तपासणी करण्यास गेल्या असता केंद्र बंद असल्याचे निदर्शनास आले. त्या संबंधित केंद्रावर 2:20 वाजेपर्यंत उपस्थित होत्या या दरम्यान त्यांनी शिवभोजन केंद्राच्या परिसरातील नागरीकांचे बयाण घेतले. बयाणामध्ये भद्रावती येथील गांधी चौकाजवळील शिवभोजन केंद्र मागिल सात ते आठ दिवसापासून बंद असल्याचे तसेच यापूर्वी सदर शिवभोजन केंद्र अधे-मधे चालु बंद असल्याची माहिती मिळाली.

कार्यालयात परत आल्यानंतर त्यांनी राज्य शासनाचे ए इ पी डी एस लॉगिन सुरु करुन पडताळणी केली असता सदर शिवभोजन केंद्राने दुपारी 12:52 ते 1:20 दरम्यान 100 याळ्यांचे वितरित झाल्याचे ऑनलाईन दाखवले होते. वास्तविक बघता निरीक्षण अधिकारी हर्षा दुधे ह्या त्यावेळी संबंधित शिवभोजन केंद्रावर उपस्थित होत्या मात्र केंद्र संचालक राहुल सोनटक्के ह्यांनी शासनाला थाळ्या वितरित केल्याचे दाखविले होते हे विशेष. ह्या प्रकारावरून संबंधित केंद्र संचालक शिवभोजन केंद्र बंद असतांना सुध्दा मोबाईल व्दारे चुकीच्या पध्दतीने छायाचित्रे अपलोड करत असल्याचे निदर्शनास आले.

ह्या तपासणीचा अहवाल तहसीलदार भद्रावती यांचेकडे सादर करण्यात आल्यानंतर शिवभोजन केंद्रचाकांना दिनांक 26.07.2023 व 15,09.2023 रोजीच्या पत्रान्वये शिवभोजन केंद्रामधिल सी.सी.टी.व्ही. फुटेज सादर करण्याचे आदेश दिले मात्र शिवभोजन केंद्र संचालक राहुल सोनटक्के ह्यांनी सी.सी.टी. व्हो. फूटेज सादर केले नाही.

दिनांक 01.07.2023 ते 05.07.2023, दिनांक 14.07.2023 ते 15.07.2023 व 17.07.2023 संबंधित शिवभोजन केंद्रातील 100 थाळ्यांचे वितरण तपासले असता कमीत कमी 27 मिनीट व जास्तीत जास्त 85 मिनिटांच्या दरम्यान थाळ्यांचे वितरण शिवभोजन केंद्रचालकाने केल्याचे आढळून आले. सदर शिवभोजन केंद्रात एका वेळेस जास्तीत जास्त 6 लाभार्थी बसण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे नमुद वेळेत 100 लाभार्थ्यांना भोजन वितरण शक्य नाही कारण केंद्रात बसूनच भोजन देण्याचा नियम असुन कुणालाही पार्सल देणे नियमांच्या विरुद्ध आहे. ह्यावरून शिवभोजन शिवभोजन केंद्रावर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वाळीचे वितरण न करता फक्त मोबाईलव्दारे छायाचित्राचे फाटो अपलोड करत असल्याचे सिद्ध होत असल्याने 06 नोव्हेंबर 2023 ला संबंधित शिवभोजन केंद्रचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती व त्यांचे लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

दिनांक 01 डिसेंबर 2023 ला झालेल्या सुनावणीस दरम्यान केंद्र संचालक राहुल सदाशिव सोनटक्के, साधु बहुउद्देशीय संस्था, शिवभोजन केंद्र, भद्रावती ह्यांनी लेखी स्पष्टीकरण सादर करून शिवभोजन केंद्राचे बिल न निघाल्याने 05 ऑक्टोबर 2023 रोजी शिवभोजन केंद्र बंद असल्या नमूद केले. तसेच, यापूर्वी आढळून आलेल्या अनियमिततेबाबत रुपये 5000/- दंडाची रक्कम शासनजमा केल्याचे स्पष्टीकरणात नमूद केले. परंतु उर्वरित त्रुट्यांचे अनुषंगाने स्पष्टीकरणामध्ये भाष्य केलेले नाही.

 

 

बहुउद्देशीय संस्था, शिवभोजन केंद्र संचालक राहुल सोनटक्के वारंवार शिवभोजन केंद्र बंद ठेऊन लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनेपासून वंचित ठेवत आहेत त्याचप्रमाणे ते केंद्र बंद असुनही शासनाच्या पोर्टलवर अवैधपणे लाभार्थ्यांचे फोटो अपलोड करून शासनाची फसवणूक तसेच शासकीय निधीचा अपहार करत असल्याचे स्पष्ट होते. तरीही केंद्र संचालकाला केवळ 5000 रुपयांचा शुल्लक दंड कोणत्या आधारावर ठोठावण्यात आला हे अनाकलनीय असुन झालेल्या कारवाई वरून केंद्र संचालक व अधिकारी ह्यांच्यात साटेलोटे असल्याचा संशय बळावला आहे. त्याचप्रमाणे निर्धारित क्षमतेपेक्षा कमी आसनव्यवस्था असतानाही ह्या केंद्राला परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न निर्माण होत असुन केंद्र मान्यता देण्यात अर्थपुर्ण संबंध नियमांची पायमल्ली करण्यास पाठबळ देत असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये