ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘वंदे मातरम् चांदा’ कॉल सेंटरवरील प्राप्त तक्रारींचा आढावा

जिल्हाधिकार्यांनी दिली सेंटरला भेट

चांदा ब्लास्ट

नागरिकांच्या समस्या व तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यासाठी तसेच शासकीय व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व सरकारी विभाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका देखरेखीखाली आले आहेत. तुकूम येथे स्थित तक्रार निवारण प्रणालीच्या कॉल सेंटरला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, तांत्रिक सहाय्यक अनुराग गयनेवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, कॉल सेंटरला आतापर्यंत प्राप्त तक्रारीची यादी अद्ययावत ठेवावी. तक्रारीचा विषय व सदर तक्रार कोणत्या विभागाशी संबंधित आहे, याबाबत माहिती उपलब्ध ठेवावी तसेच दैनंदिन तक्रारीची नोंद ठेवावी. ज्या तक्रारकर्त्याचे प्रश्न प्रलंबित असतात व लवकर सुटत नाही, अशा तक्रारीबाबत  प्रशासनाला कळवावे, अशा सूचनाही जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी श्री.गौडा यांनी आतापर्यंत प्राप्त  तक्रारी, निराकरण करण्यात आलेल्या तक्रारी, प्रलंबित तक्रारी तसेच कॉल सेंटरमधील कार्यरत चमु, दैनंदिन येणारे कॉल, याबाबत माहिती जाणून घेतली.
आतापर्यंत ७१० तक्रारींचे निराकरण :
 ‘वंदे मातरम् चांदा’ या तक्रार निवारण प्रणालीवर आजपर्यंत १०३८ तक्रारी प्राप्त झाल्या असून ७१० तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारी प्रक्रियेमध्ये आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी स्वतः कॉल सेंटरच्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून तपासणी केली. तसेच आतापर्यंत आलेल्या विविध तक्रारी जाणून घेतल्या.
अशी नोंदवा तक्रार : 
तक्रार नोंदवण्यासाठी १८०० -२३३-८६९१ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. कार्यालयीन वेळेत सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल. टोल फ्री क्रमांकावरील प्राप्त तक्रारी vandemataramchanda.in या संकेतस्थळावर नोंदविली जाईल व संबंधित विभागास पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात येईल.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये