ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुप्त गुण विकसित होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग आवश्यक – गटशिक्षणाधिकारी मुसदवाले

श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे रा.से.यो. शिबिर विविध उपक्रमांनी संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे युवकांचे सळसळते रक्त आहे. युवकांमध्ये आत्मविश्वास तसेच विविध मूल्ये रासेयो रुजवते. संस्कार होण्यासाठी तसेच सुप्त गुण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन दे.राजा पं.स.चे गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांनी केले. दत्तकग्राम सावखेड भोई येथे श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबिर समारोप समारोह प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. नरेंद्र शेगोकार हे उपस्थित होते. व्यासपीठावर मान्यवर अतिथी म्हणून समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे व छगनराव भुजबळ महाविद्यालय, हिवरा आश्रमचे प्राचार्य डॉ. दिपक म्हस्के हे उपस्थित होते. या शिवाय जि.प. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष टेकाळे, ग्रामपंचायत सदस्य. श्री. महेंद्र जाधव यांचीसुद्धा व्यासपीठावर उपस्थिती होती.

महाविद्यालयातील रा.से.यो. विभागाच्या वतीने ‘युवा भारत, विकसित भारत, सशक्त भारत’ अंतर्गत ‘संपूर्ण ग्राम स्वच्छता’ हे ब्रीद घेऊन दि. १६ फेब्रुवारी २०२४ ते २३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले.

प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, प्राचार्य डॉ.दिपक म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवकांनी समाजासाठी काहीतरी करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी कु.सानिया सिद्दीकी व विठ्ठल चव्हाण या स्वयंसेवकांनीही मनोगत व्यक्त केले.

रासेयो शिबिरादरम्यान विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. स्वच्छता रॅली, एड्स जनजागृती रॅली, मतदार जनजागृती रॅली, संस्कृती संवर्धन, महिला सबलीकरण यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. दुपारच्या बौद्धिक सत्रात पर्यावरण संवर्धन, हस्ताक्षर सुधार, व्यक्तिमत्व विकास, युवकांचा देश विकासात सहभाग, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जीवनपट अशा महत्त्वाच्या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. सायंकालीन सत्रात ग्रामस्थांसाठी विविध विषयावर अतिथी व्याख्याने आयोजित करण्यात आली. या शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता, शोषखड्डे खोदणे, प्लास्टिक निर्मूलन, एड्स जनजागृती, स्त्री-पुरुष समानता, रॅली असे विविध उपक्रम राबविले. सिकलसेल तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कामकाजाचा आढावा रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. महेंद्र साळवे यांनी मांडला. शिबिर समारोप समारोहाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका कु. सुनंदा कुहिरे हिने केले.

 या दरम्यान कार्यक्रम अधिकारी, सहकार्यक्रमाधिकारी, स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, रा. से. यो. स्वयंसेवक व स्वयंसेविका तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.

शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये