ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हयात १ लक्ष ५५ हजार ४३५ बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट

३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

चांदा ब्लास्ट

‘दोन थेंब प्रत्येकवेळी….पोलिओ वर विजय दरवेळी’ या संकल्पनेनुसार रविवार दि. ३ मार्च रोजी पल्स पोलिओ मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील १ लक्ष ५५ हजार ४३५ बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.२८) आढावा बैठक घेतली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हिलन्स मेडीकल ऑफिसर डॉ. साजिद, जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिचारिका सुरेखा सुपराळे, सुरेखा ठाकरे आणि भावना सोंडवल आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, पल्स पोलिओ लसीकरणापासून ० ते ५ वयोगटातील एकही बालक वंचित राहता कामा नये. बाहेरून स्थलांतरीत झालेले नागरिक किंवा वस्त्यांवर विशेष लक्ष द्यावे. जेथे लसीकरण कमी होते, अशा ठिकाणांना आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करावी. तालुकास्तरावरही कार्यालय प्रमुखांनी लसीकरण मोहिमेबाबत बैठक घेऊन योग्य नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

भारतात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, याकरीता यावर्षीसुध्दा शासनातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची एकच फेरी दि. ३ मार्च २०२४ रोजी राबविण्यात येत आहे. या दिवशी ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना बुथवर पोलिओ लस पाजण्यात येणार आहे व १०० टक्के बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यात २३४९ लसीकरण केंद्रे व २६२ मोबाईल टीम : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागात २११७ लसीकरण केंद्रे, शहरी भागात ८८ व महानगरपालिका क्षेत्रात १४४ अशी एकूण २३४९ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात करण्यात आली आहेत. या व्यतिरीक्त प्रवासात असलेल्या बालकांना, स्थलांतरीत होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलिओ लस मिळावी याकरीता ग्रामीण भागात १९० मोबाईल टिम, शहरी भागात २१ व महानगरपालिका क्षेत्रात ५१ अशा २६२ मोबाईल टिमची व्यवस्था केलेली आहे. तसेच टोलनाका, बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, यात्रास्थळे या ठिकाणीसुध्दा ट्राझिंट टिमव्दारे लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे.

भारत २०११ पासून पोलिओ मुक्त : पोलिओ रोगाचे निर्मुलन करण्याचे हेतुने भारत सरकार १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवित आहे. तसेच नियमित लसीकरण, ए.एफ.पी. सर्व्हेक्षण व पोलिओ रुग्ण आढळल्यास मॉप अप रॉउंड याव्दारे पोलिओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. देशात १३ जानेवारी २०११ नंतर अद्यापपर्यंत पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पोलिओ निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासुन प्रथमच अशा पध्दतीने यश मिळालेले आहे. जानेवारी २०१४ मध्ये भारताला पोलिओ निर्मुलन प्रमाणपत्र मिळाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये