ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरमध्ये प्रथमच फिरते नेत्र चिकित्सालयाचे आयोजन

स्‍व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्‍या स्‍मरणार्थ श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेचा उपक्रम

चांदा ब्लास्ट

बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात विकासाचा झंझावात निर्माण करून या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलविणारे लोकनेते राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय तथा चंद्रपूर-वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने स्‍व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार फिरते नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून श्री माता कन्‍यका सेवा संस्था जनकल्याणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रथमच अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार असून या माध्यमातून १८ ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत खेड्यापाड्यांमधील रुग्णांचे डोळे तपासणे, निःशुल्क चष्मांचे वितरण आणि नेत्र शस्त्रक्रिया या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर यांच्‍या सौजन्‍याने स्‍व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार फिरते नेत्र रुग्णालय दि. १८ फेब्रुवारीपासून नागरिकांच्या सेवेत येणार असून सकाळी १० वाजता भटाळी येथील ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या हस्‍ते उपक्रमाचे उद्घाटन होईल. दि. २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत नियमितपणे विविध गावांमध्‍ये शिबिरे आयोजित करुन नेत्र तपासणी करण्‍यात येईल. यामध्‍ये गरजुंना चष्‍मे वितरण करण्‍यात येतील. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कारणांनी वैद्यकीय सेवांचा लाभ घेणे शक्य होत नाही. अशात ते अनेक आजारांचा घरीच सामना करतात. लोकांना रुग्णालयापर्यंत येणे शक्य होत नसेल तर रुग्णालय लोकांपर्यंत जावे, या भूमिकेतून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी फिरत्या नेत्र रुग्णालयाची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या रुग्‍णालयाद्वारे गावामध्‍येच उपचार करण्‍यात येणार आहे. या शिबिरांमध्‍ये नेत्र शस्‍त्रक्रियेकरिता पात्र असलेल्‍यांना दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी प्राथमिक आरोग्‍य केंद्र दुर्गापूर येथे सेवाग्राममधील तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून तपासणी करुन शस्‍त्रक्रिया करण्‍यात येईल. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष सुदेश कापर्तीवार,सचिव राजेश्‍वर सुरावार व शैलेंद्रसिंग बैस यांनी केले आहे. शिबिराचे आयोजनाकरीता रामपाल सिंग, हनुमान काकडे, गौतम निमगडे, फारुख शेख, रोशनी खान, केमा रायपुरे, देवानंद थोरात, शांताराम चौखे,अनिता भोयर, विलास टेंभुर्णे, राकेश गौरकार, बंडू गौरकार, श्रीनिवास जंगमवार, दयानंद बंकुवाले, वासुदेव गावंडे, चंद्रकांत धोडरे, रविंद्र पाम्‍पट्टीवार, अशोक आलाम, जयंत टापरे, अरविंद राऊत हे मेहनत घेत आहे.

१ लाखांहून अधिक नागरिकांची आरोग्यसेवा

रुग्‍णसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे, या भावनेतून श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था सातत्‍याने आरोग्‍य शिबिरांचे आयोजन करीत आहे. आतापर्यंत १ लाखांहून अधिक नागरिकांना विविध शिबिरांच्‍या माध्‍यमातून आरोग्‍यसेवांचा लाभ मिळाला आहे. ८ हजार नागरिकांवर मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. ४० हजार नागरिकांना चष्‍मे वितरीत करण्‍यात आले आहेत. १०० हून अधिक बालकांवर यशस्वी हृदयविकार शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. यासोबतच ५०० हून अधिक दिव्‍यांग बांधवांना तीन चाकी सायकल वितरीत करून त्यांचे जगणे सुसह्य केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये