ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संवाद प्रतिष्ठानचे ‘स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार २०२४’ जाहीर

गंगूबाई जोरगेवार, पुष्पा पोडे, अल्‍का ठाकरे, प्रतीक्षा शिवणकर, रुबीना पटेल यांचा समावेश

चांदा ब्लास्ट

संवाद प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार २०२४’ चे वितरण येत्या २५ फेब्रुवारीला होईल. स्थानिक इंदिरा गांधी सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय हिरकणी सांस्कृतिक महोत्सवात सकाळी १० वाजता पुरस्कारप्राप्त महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाईल. संवाद प्रतिष्ठानने मागील वर्षीपासून या पुरस्कारांची सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच महिलांना दरवर्षी स्त्री शक्ती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

संवाद प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार २०२४’ चे वितरण सोहळ्याच्या उद्‌घाटक म्‍हणून आमदार तथा माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, अध्यक्षस्‍थानी आमदार प्रतिभा धानोरकर तर प्रमुख अतिथी म्‍हणून आमदार सुधाकर अडबाले यांची उपस्‍थिती राहणार आहे. यावर्षीचा राजमाता जिजाऊ मातृ सन्मान पुरस्कार गंगूबाई (अम्‍मा) जोरगेवार यांना जाहीर झाला आहे. यांनी अत्‍यंत बिकट परिस्‍थितीतून कुटुंबाला सावरत आजवर अनेकांना मदतीचा हात दिलेला आहे. एक आदर्श माता म्‍हणून आपले स्‍थान निर्माण केले. त्‍यांचा हा प्रवास आज हजारो महिलांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

माता रमाई समता पुरस्काराने सौ. पुष्पाताई पोडे यांना सन्मानित केले जाईल. कोरोनासारख्या महामारीच्या काळात रक्‍ताची नाती सुद्धा दुरावती होती. त्‍याकाळात पुष्पा पोडे यांनी रुग्णांना आधार देत त्‍यांचे जीव वाचविले. या कार्याबद्दल नुकतेच त्‍यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्‍ते गौरविण्यात आले. सावित्रीमाई ज्ञानज्योती पुरस्काराने सौ. अल्‍का ठाकरे यांना गौरविण्यात येईल. अल्‍का ठाकरे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करीत आहेत. एक आदर्श शिक्षीका म्‍हणून त्‍या ओळखल्‍या जातात. स्‍काऊट गाईडच्या माध्यमातून सेवेचा वारसा त्‍यांनी जपला आहे.

राणी हिराई प्रेरणा पुरस्‍काराने प्रतीक्षा शिवणकर यांना गौरविण्यात येईल. गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील प्रतीक्षा शिवणकर यांनी मुंबई गाठून सिनेसृष्टीत यशस्‍वी पाऊल टाकले. एका लग्‍नाची पुढची गोष्ट, जीवाची होतीया काहीली (सोनी मराठी) या मालिका व कॉलेज डायरी या चित्रपटात मुख्य भूमिका प्रतीक्षा यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सेवाव्रती पुरस्कार रुबीनाजी पटेल यांना घोषित झाला आहे. रुबीनाजी पटेल या मुस्लिम महिलांमध्ये संविधानिक अधिकारांविषयी मागील अनेक वर्षांपासून जाणीव जागृतीचे कार्य करीत आहे. या कामामुळे महिलांना आपल्‍या अधिकारांची जाणीव झाली. त्‍यांचे मुस्लिम समाजात सकारात्‍मक परिणाम दिसायला लागले आहेत.
सांस्‍कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी ‘स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार २०२४’ चे वितरण सोहळ्यानंतर हिरकणी सांस्‍कृतिक महाेत्‍सव होणार आहे. या सांस्‍कृतिक कार्यक्रमात विदर्भातून महिला सहभागी होत असून ग्रृप डान्‍स, गायन, मिमिक्री, फॅशन शो आदी कार्यक्रम होईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये