राष्ट्रीय सेवा योजना हे संस्कार निर्माण करणारे व्यासपीठ – मोहनबाबू अग्रवाल
रासेयो 'श्रमसंस्कार शिबिराचे' उदघाटन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नांदोरा: ‘श्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तरूण पिढीमध्ये श्रमाची प्रतिष्ठा निर्माण व्हावी हा हेतू पुढे ठेवून त्यांना योग्य संस्कार देण्याची नितांत गरज आहे. या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजना हे संस्कार निर्माण करणारे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी देवळीच्या एस.एस.एन.जे. कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटन प्रसंगी 1 फेब्रुवारी रोजी नांदोरा ग्राम येथे केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले तर उदघाटक म्हणून समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अंबिका कोसपटे, उपसरपंच राजू इंगोले, जेष्ठ नागरिक मनिष देशमुख, प्रहारचे सचिव संतोष तुरक,सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीश यावले व रासेयो कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
सदर राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे शिबिर 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत नांदोरा (डफरे) ग्राम येथे असून यात 50 स्वयंसेवकांचा समावेश आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य ढाले म्हणाले ‘स्वच्छ ग्राम सुंदर ग्राम’ ही संकल्पना साकारायची असेल तर तरूण स्वयंसेवकांनी पुढाकार घेणे आवश्यक असून या संदर्भात राष्ट्रीय सेवा योजना आपली सामाजिक भुमीका निभवित आहे, हे प्रशंसनीय असून इतरांकरीता प्रेरणादायक आहे.
उदघाटनाचे प्रास्ताविक शिबिर प्रमुख तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले. संचालन प्रा. जगदीश यावले यांनी तर आभार पायल चौके हिने केले.
कार्यक्रमाची सांगता ‘हम युवा प्रहारी हम बढे चलो, बढे चलो, जागरण समाज मे करेंगे हम बढे चलो…..’ या युवा गीताने झाली. यशस्वीतेकरीता शेखर भोगेकर, अक्षय जबडे, प्रतीक क्षीरसागर, साहील रामगडे व महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद करीत आहेत.