ताज्या घडामोडी

लोकशाहीच्या रक्षणाकरिता पत्रकारांनी नीतिमत्ता जोपासून लेखणी झिजवावी – राजेंद्र मर्दाने

चांदा ब्लास्ट –

*वरोरा*: देशातील घटनात्मक संस्था कर्तव्य बजावताना दुजाभाव करत असल्याची उदाहरणे प्रकर्षाने उघडकीस येत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असुरक्षितेची भावना पसरत असल्याने पत्रकारांनी नीतिमत्ता जोपासून लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपली लेखणी झिजवावी, असे आवाहन राष्ट्रीय सामाजिक न्याय कृति मंचाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा पत्रकार सुरक्षा समिती, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी येथे केले.

पत्रकार सुरक्षा समिती, आनंदवन मित्र मंडळ, वरोरा व ओशनिक बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन येथील स्वरानंदवन सभागृहात ‘पत्रकार दिन ‘ साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समिती, वरोराचे विश्वस्त सदाशिवराव ताजने हे होते.
व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ता आसिफ रजा, पोद्दार स्कूलचे संचालक सचिन बुरीले, बोर्डा ग्राम पंचायत सदस्य उमेश देशमुख, आनंदवन मित्र मंडळ, वरोऱ्याचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, म.रा. मराठी पत्रकार संघ, वरोरा शाखा अध्यक्ष प्रवीण गंधारे, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे संचालक राहुल देवडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


मर्दाने पुढे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांची खरी जन्मतारीख २० फेब्रुवारी १८१२ आहे. ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी ‘ दर्पण ‘ या आंग्लभाषीय वृत्तपत्राची सुरुवात मुंबई येथे करून मराठी वृत्तपत्राची ज्योत प्रज्वलित केली. मराठीतील पहिल्या ‘ दिग्दर्शन ‘ या मासिकाचेही ते संस्थापक संपादक होते. त्यांनी ‘ दर्पण ‘ मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला.ते खऱ्या अर्थाने आद्य सुधारक,आद्य मराठी पत्रकार व आद्य प्राध्यापकही होते,असे त्यांनी नमूद केले.आज भांडवलदारांनी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर कब्जा केल्याने मोठया वर्तमानपत्रांच्या पत्रकारांना ,संपादकांना स्वतंत्रपणे लिखाण करण्यावर निर्बंध आहेत. मिंध्ये होऊन मालकाची जी हुजुरी करण्यापेक्षा बुद्धिवादी पत्रकारांनी स्वतःचे साप्ताहिक, पाक्षिक काढून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी माध्यमांची स्वतंत्रता आणि निष्पक्षता टिकवून सत्तेच्या दुरुपयोगाला थांबविण्याचे आव्हान पेलावे , असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात ताजने म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील त्यांचे स्थान आदराचे असल्याने त्यांनी विश्वासार्हता जपणे अत्यंत आवश्यक आहे. पत्रकारांनी कोणत्याही राजकीय पक्षाची बांधीलकी न स्वीकारता जनसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडून विकासाचे राजदूत व्हावे.
यावेळी असिफ रजा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले व दीप प्रज्वलन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले. आभार राहुल देवडे यांनी मानले.
कार्यक्रमात आनंदवनाचे कार्यकर्ते दीपक शीव, पत्रकार खेमचंद नेरकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर देवडे, आकाश खातरकर, गजानन गायकवाड, रोशन बहादे आदींसह स्वरानंदवनातील कलाकार, महिला, गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये