ताज्या घडामोडी

ताडोबा तिकीट विक्री घोटाळा येणार अंगलट – ठाकूर बंधूंची जमानत याचिका फेटाळली

शासनाला घातला 12 कोटींचा गंडा

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

ताडोबा जंगल सफारीसाठी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली वनविभागाची 12 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बहुचर्चित आरोपी ठाकूर बंधूंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर आता दोन्ही आरोपींना केव्हाही अटक होऊ शकते.

ताडोबातील जंगल सफारीच्या ऑनलाइन बुकिंगसाठी पर्यटकांकडून त्यांच्या पोर्टलवरून घेतलेली 12 कोटी रुपयांहून अधिकची बुकिंग रक्कम परत न केल्याने वनविभागाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. वनविभागाकडे, पोलिसांनी स्थानिक गुरुद्वारा परिसरात राहणाऱ्या अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर नावाच्या दोन सख्ख्या भावांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यापासून दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत आहेत. दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. ही याचिका 29 ऑगस्ट रोजी न्यायालयाने फेटाळली, त्यामुळे आता येत्या काही दिवसांत दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात जाण्याची शक्यता बळावली आहे.

विशेष म्हणजे ताडोबा जंगल सफारीसाठी चंद्रपूर वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन नावाच्या कंपनीने ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालकासोबत करार केला होता. ही कंपनी चंद्रपूर येथील गुरुद्वारा रोड येथील अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन भावांची आहे. या करारानुसार, ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन सफारी बुकिंग करीत होती. मात्र 2020 ते 2023 या कालावधीत सदर कंपनीने आपल्या वेब पोर्टलवर बुकिंग करून देश-विदेशातील पर्यटकांकडून मोठी रक्कम प्राप्त केली, या रकमेपैकी या कंपनीने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे 22 कोटी 20 लाखांची रक्कम जमा करणे क्रमप्राप्त होते मात्र या कंपनीने केवळ 10 कोटी 65 लाख जमा करून उर्वरित 12 कोटी 15 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

चार वर्षांचे लेखापरीक्षण केल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली. शासकीय निधीचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. रामनगर पोलिसांनी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये