‘ट्रान्सजेंडर’ या घटकांच्या प्रश्नांचे प्रभावी सादरीकरण ‘जेंडर अँन आयडेंटिटी’ या नाटकाच्या माध्यमातून
एकूणच नवोदिता चंद्रपूरच्या चमूने तृतीय पंथीयांच्या वेदना व आक्रोश मांडत प्रेक्षकांना केले अंतर्मुख
चांदा ब्लास्ट
तृतीयपंथी अर्थात ट्रान्सजेंडर या घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्या वेदना, आक्रोश मांडण्याचा प्रभावी प्रयत्न नवोदिता चंद्रपूर या संस्थेने जेंडर अँन आयडेंटिटी या नाटकाच्या माध्यमातून केला. डॉ सोमनाथ सोनवलकर लिखित हे नाटक प्रशांत कक्कड यांनी दिग्दर्शित केले.
अनिरुद्ध आणि रजनी यांचा मुलगा समलिंगी असतो. त्याच्यात दडलेली स्त्री त्याच्या आईला मान्य नसते पण वडील त्याच्या कलाने विचार करतात. एक दिवस तो घर सोडून हिजड्यांच्या वस्तीत जातो. तिथे नानी या हिजडा गुरुचे शिष्यत्व स्वीकारतो. लिंग बदलाचे ऑपरेशन करून त्याला स्त्रीत्व अनुभवायचे असते. त्याचे वडील अनिरुद्ध तृतीयपंथी बनून त्या वस्तीत जातो व आपल्या मुलाला परत येण्यासाठी विनवणी करतो पण तो त्याचा निर्णय बदलत नाही .त्याचे नामकरण खुशी असे करण्यात येते.खुशी हिजड्यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील असताना स्वतःचे शील प्राणपणाने जपते. अशात एकदा एक टोळी येऊन हिजड्यांना मारहाण करते व त्यात खुशीवर बलात्कार होतो. या घटनेने खचलेली खुशी आत्महत्या करते.
पोलीस खुशीचे प्रेत हिजड्यांना देण्यास नकार देतात पण अनिरुद्ध तिथे येतो. हिजडे अनिरुद्ध ला मारण्याचा प्रयत्न करतात, अनिरुद्ध जेव्हा त्यांना वस्तुस्थिती सांगतो तेव्हा नानी व सर्वच जण अनिरुद्धला समजून घेतात व खुशीचे प्रेत घेऊन जाण्यास सांगतात.मात्र अनिरुद्ध खुशी तुमचीच असल्याचे सांगत नानी सोबत खुशीवर अंत्यसंस्कार करतो. शेवटी रजनी तिथे येते व खुशीबाबत आपण चुकल्याची कबुली देते. यापुढे अनिरुद्ध ने तृतीयपंथीय घटकांवर लिहावे आपण त्याच्या सोबत असल्याचे सांगते व शेवट होतो. हे नाटकाचे संक्षिप्त कथानक. या कथानकाला जोडून हिजड्यांच्या गॅंगचे जगणे, त्यांचे प्रश्न व समस्या यावर नाटकात प्रभावी पणे भाष्य करण्यात आले आहे.
दिग्दर्शक प्रशांत कक्कड यांनी नाटकाला उत्तम ट्रीटमेंट देत प्रसंग खुलविले आहेत. सुशांत भांडारकर व सुदर्शन बारापात्रे या नेपथ्यकारांनी तीन पातळ्यावर नेपथ्य बदलत आपले कौशल्य सिद्ध केले. रेल्वे प्लॅटफॉर्म, अनिरुद्ध चे घर व नानी चा महाल अशी तीन स्थळं प्रामुख्याने नेपथ्याच्या माध्यमातून साकारली. मिथुन मित्र यांची प्रकाशयोजना उत्तम व प्रसंगानुरूप होती. राज बारसागडे, वैभव पाराशर, सौरभ कुलकर्णी यांचे संगीत देखील उत्तम होते. शुभदा कक्कड व इशा भांडारकर यांची रंगभूषा व वेषभूषा प्रभावी होती. तृतीयपंथीयांचे नटणे व पेहराव उत्तम पध्दतीने साकारण्यात आले.
कलावंतांचा उत्तम अभिनय ही नाटकाची आणखी एक जमेची बाजू. नानीच्या भूमिकेत प्रशांत कक्कड, अनिरुद्ध च्या भूमिकेत प्रशांत मडपूवार, खुशी च्या भूमिकेत गौरव भट्टी, रजनी च्या भूमिकेत माधवी भट, स्नेहल राऊत, कल्याणी भट्टी या कलावंतांनी प्रभावी केला. प्रज्ञा नंदराज, कृष्णा सुरमवार, निखिल सुरमवार, सुशांत भांडारकर, ज्योत्स्ना निमगडे, प्रदीप निमगडे, सुप्रज्योती निमगडे, प्रज्वल निखार,तलाश खोब्रागडे, रोशन गजभिये, विशाल टेम्भुरणे, स्मृती राऊत, भीष्म सिंग, महेश मेश्राम,चेतन धकाते, क्रांतिवीर सिडाम, प्रथमेश दंताळे, लकी पिंपळकर, राघव पाराशर, स्वप्नील सिरपूरवार आदी कलावंतांनी उत्तम साथ दिली. एकूणच नवोदिता चंद्रपूर च्या चमूने तृतीय पंथीयांच्या वेदना व आक्रोश मांडत प्रेक्षकांना अंतर्मुख केले.