Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिवृष्टीच्या मदतीपासून हजारो शेतकरी वंचित

राष्ट्रवादीचे तहसील प्रशासनाला निवेदन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

         मागील वर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने जाहीर करूनही अनेक शेतकऱ्यांची माहिती अपडेट होत नसल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली असून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत जमा करा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार श्याम धनमने यांच्याकडे करण्यात आली करा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

     राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मागील वर्षी तालुक्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची अतोनात नुकसान झाले होते. शेत जमीनही खरडून गेली होती. यासाठी शासनाने तालुक्यात अतिवृष्टी जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही रक्कम थेट शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांच्याकडे माहिती अद्यावत करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने सोपवली होती. मात्र आपल्याकडील कामाचा ताण पाहता तसेच हे काम महसूल यंत्रणांचे असल्याने ग्रामसेवक संघटनांनी शेतकऱ्यांची माहिती अपडेट करण्यास नकार दर्शविला होता. परिणामी तालुक्यातील अद्यापही अनेक शेतकऱ्यांची माहिती अद्यावत होत नसल्याने अतिवृष्टीच्या मदतीपासून या शेतकऱ्यांवर वंचित राहण्याची वेळ आली आहे. केवळ प्रशासनातील अधिकाऱ्याच्या समन्वय अभावामुळे आणि हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना ही मदत मिळणे कठीण झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी घोषणा करून सुद्धा केवळ ऑनलाइन माहिती अपडेट होत नसल्याने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे.

यासाठी स्थानिक तहसील प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादीचे विनायक पाटील,प्रमोद घोंगेपाटील,राजेश पाटील इंगळे,जहीर पठाण,जनार्दन मगर,अजमत खान,विजय खांडेभराड,शंकर वाघमारे,अनिस शाह,इमरान कुरेशी, मुबारक चाऊस, राजू गव्हाणे,असलम खान,साजिद खान,शे.सादिक,सय्यद मोईन,शे.मन्सूर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये