सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या घरातील प्रश्नांवर प्रभावी भाष्य – यक्षप्रश्न

चांदा ब्लास्ट
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक सदस्य जेव्हा आजारी पडतो व त्याच्या उपचारासाठी मोठया खर्चाचा डोंगर त्या कुटुंबासमोर उभा ठाकतो . त्या कुटुंबातील सदस्यांपुढे उभा ठाकलेला यक्षप्रश्न चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र अधिकारी मनोरंजन केंद्र या संस्थेने नाटकाच्या माध्यमातून उत्तमरित्या सादर केला.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्यांना ज्या प्रश्नांचा सामना करावा लागतो त्यावर लेखक सुनील देशपांडे यांनी यक्षप्रश्नच्या माध्यमातून भाष्य केले आहे. दिघे परिवारात घडणारे हे नाटक इच्छामरण, अवयवदान, देहदान या विषयावर भाष्य करताना दिघे कुटुंबीयांची घुसमट प्रभावीपणे मांडते. कुटुंबप्रमुखाच्या आजाराचा खर्च कसा करायचा हा यक्षप्रश्न दिघे कुटुंबातील सदस्यांसमोर उभा ठाकतो. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या माणसासोबत कुटुंबातील सदस्य सुद्धा मरण यातना भोगतात ही मध्यमवर्गीय कुटुंबातील समस्या या कथानकात मांडण्यात आली.
राजेंद्र पोइनकर, सायली देठे, मयूर पांडे, साधना चव्हाण, संदीप गुठे, दिगंबर इंगळे, सदाशिव आघाव यांनी आपापल्या भूमिका चोखपणे वठवील्या. कथानकातील आशय कलावंतांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोचविला .विष्णू पगारे यांचे दिग्दर्शन उत्तम होते.
दिगंबर इंगळे, छोटेंद्र घायवन यांचे नेपथ्य उत्तम व अनुरूप होते. फोटोतून दिवंगत आई बोलतानाचा प्रसंग नेपथ्य व प्रकाशयोजनाकाराने उत्तम साकारला. विष्णू पगारे व संकेत देवरे यांची प्रकाशयोजना नाटकाला अनुरूप होती. राहुल आसावा,संकेत पगारे, संकेत देवरे यांचे संगीत देखील उत्तम होते. दीपाली इंगळे आणि पुष्पा पगारे यांची रंगभूषा, वेषभूषा देखील नाटकाला अनुरूप होती. एकूणच यक्षप्रश्न च्या चमूने उत्तम सादरीकरण करत स्पर्धेत रंग भरला.