ताज्या घडामोडी

गर्भवती महिलेला औषध देण्यास परिचारिकेचा नकार – राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

दोषी परिचारिकेला निलंबित करा - आदिवासी टायगर सेनेची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना गरजेनुसार औषध देणे हे बंधनकारक असतानाही उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना औषध देण्यास नकार देण्यात येत असुन रुग्णालयातील परिचारिका रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राजुरा येथील इंदिरानगर वार्डात वास्तव्यास असलेली एका गर्भवती महिला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे तपासणी करिता गेली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला काही औषधे लिहून दिली व रुग्णालयातून ती औषधे घेण्यास सांगितले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्या महीलेने परिचारिकेकडे औषधांची मागणी केली असता गर्भवती महिला राजुरा येथील रहिवासी नसल्याचे कारण देत सोनाली शेंडे नामक परिचारिकेने गर्भवती महिलेला औषधे देण्यास चक्क नकार दिला.

अखेरीस दुसऱ्या दिवशी सदर गर्भवती महिला औषधे घेण्याकरिता परत एकदा उपजिल्हा रुग्णालयात गेली असता तिला दुसऱ्यांदा औषधे देण्यास नकार देण्यात आल्याने तिने राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते आदित्य भाके, अशोक राव व इतर काहींना आपली कैफियत सांगितली. अखेरीस सामाजिक कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिक्षकांना तक्रार केल्यानंतर त्या महिलेला औषधे देण्यात आली. या संतापजनक घटनेची गांभीर्याने दखल घेत आदिवासी टायगर सेनेचे विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे यांनी रुग्णांना औषधे देण्यास नकार देणाऱ्या सोनाली शेंडे नामक परिचारिकेला तात्काळ निलंबित करण्याची मागणी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कडे केल्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये