ताज्या घडामोडी

विदर्भाच्या भाविकांसह इतर राज्यातील भाविकांची भद्रनाग स्वामीवर श्रद्धा

महाराष्ट्रातील एकमेव भद्रशेष भद्रनाग स्वामी महाराजांचे मंदिर

चांदा ब्लास्ट :

*अतुल कोल्हे भद्रावती*
विदर्भातील एकमेव असे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पुरातन श्रीस्वामी भद्रनागाचे मंदिर नागपंचमी आणि महाशिवरात्री या धार्मिक सणाला याठिकाणी मोठ्या यात्रेचे स्वरूप असते. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगना व इतर राज्यातील असंख्य भावीक दर्शनासाठी हजेरी लावीत असतात. विशेष करून नागपंचमीला भाविकांची हजेरी मोठी असते. मंदिराचा परिसर पूजा साहित्यांसह वेगवेगळ्या दुकानांनी गजबजलेला असतो. मंदिर व्यवस्थापन कमेटीसह पोलीस विभाग या महोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी राबत असतात. नागपंचमीच्या निमित्ताने असा हा प्रपंच.

*पौराणिक भांदकचे भद्रनाग मंदिर*
वैरागडच्या नागवंशीय राजांचे राज्य दक्षिण-पश्चिमेस भांदक पर्यंत होते. याचा एक पुरावा भांदक येथे आढळतो. भांदकचे प्राचीन नाव “भद्रक” हे ज्या मंदिरावरून पडले ते भद्रेश्वराचे मंदिर भांदक येथे रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर आहे. त्यास हल्ली “भद्रनाग” असे म्हणतात. श्रीपुर- कोसल येथील पांडुवंशीय राजा उदयन याने भद्रेश्वराची स्थापना केली. त्यावरून त्या गावाचे नाव “भद्रक” असे पडले. भद्रक या नावाचा उल्लेख ८ व्या शतकातील गणेश पुराणात आला आहे. कालांतराने हे मंदिर कोसळून त्यातील शिवलिंग व नंदी नष्ट झाले. वैरागड येथील नागवंशीय राजा पैकी एखाद्या राजाने अथवा त्यांच्या प्रेरणेने लोकांनी पडक्या मंदिराचा जीर्णोद्धार करून नागाची स्थापना केली.


*भद्रावती परिसरात भद्रनाग स्वामींच्या अन्य चार भावंडांचे वास्तव्य*
भद्रावतीच्या भद्रनाग स्वामी व्यतिरिक्त या परिसरात ४ भावंडांचे वास्तव्य असून श्रीस्वामी भद्रनाग, श्री स्वामी चिंतामणी शेष, श्रीस्वामी दुधनशेष, श्रीस्वामी बळीनाग शेष व श्रीस्वामी नागवेली शेष अशी त्यांची नावे आहेत. श्री भद्रनाग स्वामींचे मंदिर भद्रावतीच्या प्रमुख मार्गावरील रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला आहे.श्री चिंतामणी शेषांचे मंदिर भद्रावती शहराच्या पूर्वेस सूमठाणा गावाजवळ असून पश्चिमेस दुधनशेष स्वामींचे मंदिर असून या ठिकाणी पवित्र व पुरातन दुधाळा तलाव आहे. उत्तरेला चिचोर्डी शिवारात श्रीस्वामी पानवेल शेषांचे मंदिर आहे. त्यांना मनाजी बोवा या नावाने ओळखतात. तर दक्षिणेला सुरक्षा नगर येथे बळीनाग शेषांचे मंदिर असून आता ते मंदिर रस्त्यावर आल्याने त्याच ठिकाणाच्या जवळच भद्रावती नगरपालिकेने स्थापन केले आहे. शेकडो वर्षांपूर्वी भांदक नगरीत यौनाश्व राजे होऊन गेलेत. त्यांना मुले-बाळे नसल्याने त्यांनी भद्रनाग स्वामींना पुत्र प्राप्तीसाठी साकडे घातले. त्यानंतर राजांना कन्यारत्न जन्मास आले.भद्रनाग स्वामींच्या नावाला अनुसरून राजांनी आपल्या राजकन्येचे नाव भद्रावती ठेवले. त्यावरून या नगरीचे नाव भांदक वरून भद्रावती झाले.
*भद्रनाग मंदिराची वास्तू रचना व भद्रनाग स्वामी*
जुन्या मंदिराचा जिर्णोद्वार करण्यात आला असून या मंदिराला आधुनिक रूप देण्यात आले. या मंदिरात भाविकांना कार्यक्रम घेता यावा याकरिता मंदिराच्या समोरील परिसरात बांधकाम करण्यात आले असून त्या ठिकाणी सभा मंडप तयार करण्यात आला आहे. स्वयंपाक घेऊन येणाऱ्या भाविकांकरिता पाकगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. भद्रनाग स्वामींची मूर्ती ९ फणांची असून उंची ३ फुटाहून अधिक आहे. अत्यंत विलोभनीय श्री भद्रनागाची मूर्ती शेंदुरानी लेपलेली आहे. याच परिसरात शिवलिंग असून विष्णूची शेषांवर निद्रीत अवस्थेत लेटलेली मूर्ती आहे. बाहेरच्या भागात गणपती आणि हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे. या परिसरात शिवलिंगाच्या आकाराची विहीर असून पायऱ्याद्वारे त्या विहिरीच्या तळापर्यंत जाता येते. विहिरीत भद्रनाग स्वामींचे वास्तव्य असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे भावीक या विहिरीत पूजा करीत असतात. यावेळी बेल,फूल, अक्षदा आणि दूध अर्पण करीत असतात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये