निवड समिती सदस्य तथा उपसरपंच यांची त्याच ग्रामपंचायत मध्ये चपराशी म्हणून नियुक्ती
निवड समितीचा असाही प्रतापः कारवाईची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
निवड समिती मधीलच ग्राम पंचायत चपराळा येथील उपसरपंच यालाच निवड समितीने ग्रामपंचायत चपराशी म्हणून नियुक्ती केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. यासंदर्भात किशोर भूपेंद्र ताजणे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनातून कारवाईची मागणी केली आहे.
चपराळा ग्रामपंचायतचे चपराशी पद रिक्त असल्याने सरपंच आणि सचिवांनी दिनांक ११ सप्टेंबर २०२३ ला पद भरतीची जाहिरात काढली. ही जाहीरात चुकीच्या पध्दतीने जनते सामोर प्रसारीत करण्यात आली. यात निवड समिती मधिल सरपंच, उपसरपंच, सचिव व जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या समिती मधीलच उपसरपंच ज्ञानेश्वर सिडाम यांना ग्राम पंचायत चपराशी म्हणून निवडले. जाहीरातीमध्ये मुलाखतीचा कॉलम नसतांना सुध्दा मुलाखत घेण्यात आली. तक्रारकर्ता किशोर ताजणे हा उच्च विद्याविभूषीत असून एम.ए. पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याने सुद्धा या पदासाठी अर्ज केला होता.
परंतु मला हेतूपुरस्पर डावलण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवड समितीने चपराशी म्हणून जी नियुक्ती केली आहे. ती अवैध असून त्याला तात्काळ त्या पदावरून काढून टाकण्याची मागणी सुद्धा किशोर ताजणे याने केली आहे. सदर निवेदन मुख्य कार्यपालन अधिकरी चंद्रपूर, तहसिलदार भद्रावती, गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती खासदार प्रतिभा धानोरकर यांना पाठविण्यात आले आहे.