ग्रामपंचायत करणार जि.प. शाळांची स्वच्छता..!
५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना शासनाचे निर्देश ; शाळा परिसर स्वच्छतेला मिळणार गती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
जिल्हा परिषद शाळांच्या परिसरातील स्वच्छता आणि स्वच्छतागृहांच्या देखभालीचा प्रश्न आता ग्रामपंचायत पातळीवर सोडविण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहांची स्वच्छता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठविले आहे. पत्रात जिल्हा परिषद शाळांच्या आवाराची तसेच स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी उपलब्ध नसल्याचा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत जबाबदारी स्वीकारल्यास शाळांमध्ये नियमित स्वच्छता राखणे शक्य होईल, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली होती.
शालेय शिक्षण विभागांतर्गत शाळांच्या सुविधांबाबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर ५ हजार व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार संबंधित पातळीवर आवश्यक कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याला अधिक सुरक्षित वातावरण मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
*विद्यार्थ्यांना मोठा दिलासा*
ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्याने विद्यार्थी, विशेषतः मुलींना अडचणींचा सामना करावा लागतो. स्वच्छतागृहांची योग्य देखभाल न झाल्यास दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी नियमित स्वच्छता केल्यास विद्यार्थ्यांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.
*आदेशाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक*
शासननिर्णय केवळ कागदावर न राहता त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरावर शाळनिहाय स्वच्छता व्यवस्था निश्चित करून नियमित पाहणी केल्यास या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांना मिळू शकतो. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत प्रशासनाने समन्वय साधून स्वच्छतागृहांची स्वच्छता, पाणीपुरवठा आणि परिसराची स्वच्छता याकडे नियमित लक्ष देण्याची गरज आहे.



