समर्थ कृषी महाविद्यालयात विद्यार्थिनीसाठी स्वसंरक्षण सत्र व रस्ता सुरक्षा कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा, रासेयो एककाद्वारे विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण सत्र व रस्ता सुरक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेला भारत चिरडे, पोलीस उपनिरीक्षक देऊळगाव राजा, राहुल दांडगे, पोलिस अंमलदार देऊळगाव राजा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, सलमान शेख, राजेश खांडेभराड, प्रज्ञा गुसळकर, खुशी वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा कार्यशाळांमध्ये भारत चिरडे, पोलीस उपनिरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना सिंग्नलचे पालन करा, गाडी चालवितांना मोबाईलवर बोलू नका, ड्रिंक करून गाडी चालवू नका, कानाला हेडफोन लावून गाडी चालवू नका, गाडी चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे सांगितले. सीट बेल्ट आणि हेल्मेट घालणे यासारख्या रस्ते सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करून रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या दुखापती आणि मृत्यूचे प्रमाण कसे कमी करावे याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्वसंरक्षण सत्रात राजेश खांडेभराड यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले तसेच त्यांनी विद्यार्थिनींना काही सेल्फ डिफेन्स चे प्रात्यक्षिके करून दाखवली व विद्यार्थिनींना हेल्पलाइन राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक- 112, पोलिस- 100, महिला हेल्पलाइन क्रमांक- 1091 क्रमांक सांगितले.
पोलिसांचा आणि तुमच्या कुटुंबाचा नंबर नेहमी स्पीड डायलवर ठेवा व तुमच्या हँडबॅगमध्ये नेहमी पेपर स्प्रे ठेवा. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लगेच त्यांच्या डोळ्यांत ते स्प्रे मारु शकता याविषयी रासेयो सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी जाधव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, प्रा.सचिन सोळंकी, संजय लाड व विद्यार्थी उपस्थित होते.