परसोडी शिवारात दुर्दैवी दुर्घटना: पाण्याच्या शोधात असलेल्या दोन नीलगायींचा विहिरीत पडून मृत्यू
तीन नीलगायींना जीवदान!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू तालुक्यातील परसोडी शिवारात एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या पाच नीलगायी एका जुन्या आणि नादुरुस्त विहिरीत कोसळल्या. या दुर्घटनेत दोन नीलगायींचा पाण्यात व विहिरीत असलेल्या गाळात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे व अथक प्रयत्नांमुळे तीन नीलगायींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ही घटना शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी घडली.
परसोडी शिवारातील शेतकरी प्रकाश घवघवे यांच्या शेतात शनिवारी ट्रॅक्टरने मशागतीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक शेतातील एका जुन्या, नादुरुस्त विहिरीजवळ काहीतरी हालचाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, विहिरीच्या खोल पाण्यात पाच नीलगायी पडलेल्या दिसल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घवघवे यांनी वेळ न गमावता तातडीने वनविभागाला या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्षेत्रसाहाय्यक दिनेश उईके आणि वनरक्षक रामदास धोंगडे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. या मोहिमेत परिसरातील नागरिक यादव झाडे, प्रकाश बोकडे, मेघराज झाडे, आकाश वरघणे, नरेंद्र निरगुडे यांनी जीवाची पर्वा न करता वनविभागाला मोलाची साथ दिली.
विहीर खोल आणि नादुरुस्त असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत होते. मात्र, सर्वांच्या अथक परिश्रमांनंतर तीन नीलगायींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दुर्दैवाने तत्पूर्वीच दोन नीलगायींचा पाण्यात व चिखलात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची रीतसर नोंद सिंदी रेल्वे पोलीस स्टेशन आणि केळझर वनविभाग कार्यालयात करण्यात आली आहे.
या घटनेमुळे वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे व शेतशिवारात धाव घेत आहेत. परिसरात अशा अनेक जुन्या आणि उघड्या विहिरी मृत्यूचे सापळे बनल्या आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग आणि प्रशासनाने अशा धोकादायक विहिरींना कठडे (कुंपण) घालून सुरक्षित करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



