Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

चंद्रपूर व राजुरा येथिल नाथजल संचालकाच्या आत्महत्येचे नेमके कारण काय?

कर्जबाजारीपणा की इतर काही? - राजुरा येथे काल केली आत्महत्या

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर व राजुरा बस स्थानकावर मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या नाथजल केंद्राचे 49 वर्षीय संचालक वसंत वाणी ह्यांनी राजुरा येथील भाड्याच्या राहत्या घरी दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन भर दुपारी केलेल्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार वसंत वाणी हे चंद्रपूर येथे बऱ्याच काळापासून एका शैक्षणिक संस्थेत नोकरीवर होते. त्याच संस्थेत कार्यरत एका मित्राच्या मदतीने त्यांनी चंद्रपूर व राजुरा बसस्थानकावर महामंडळाने बाटलीबंद पाणी विक्री करिता नेमलेल्या नाथ जल ह्या कंपनीचे कंत्राट घेतले होते. त्यानंतर ते स्वतः राजुरा बस स्थानकावर असलेल्या विक्री केंद्राची जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशाने चंद्रपूर येथुन राजुरा येथे कुटुंबासह स्थलांतरित झाले.

दरम्यान काही कारणांमुळे त्या शैक्षणिक संस्थेतील त्यांची सेवा खंडित झाल्याने ते पुर्णवेळ राजुरा बसस्थानकावर व्यवसाय करीत होते. काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी त्यांची पत्नी चंद्रपूर येथे असताना ते घरी गेले व त्यांनी स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ह्यावेळी त्यांच्या तीनही मुली शाळेत गेल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वसंत वाणी ह्यांची पत्नी चंद्रपूर येथुन घरी आल्यानंतर दार आतुन बंद असुन दार उघडल्यावर जात नसल्याने त्यांनी स्वयंपाक खोलीत नजर टाकली असता वसंत वाणी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळुन आले. घरमालक व शेजाऱ्यांच्या मदतीने घरात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

घरमालकांनी पोलिसांना सुचित करताच राजुरा पोलीस घटनास्थळी पोहचले व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार वसंत वाणी ह्यांनी काही वित्त पुरवठा संस्थांकडून कर्जाची उचल केली होती मात्र परतफेड करू शकत नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्याने त्यांनी आत्महत्या केली की काही कौटुंबिक कारणे अथवा व्यावसायिक कारणांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले ह्याबद्दल सत्य पोलीस तपासात समोर येईल मात्र कारण काहीही असले तरीही त्यांच्या तीन चिमुकल्या मुली मात्र अनाथ झाल्या हे वास्तव अंतर्मुख करणारे आहे हे निश्चित.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये