ताज्या घडामोडी

महामार्गावरील प्रवास, नागपुर ते मुंबई की नागपुर ते यमलोक? समृद्धी महामार्गाचे एकाचवेळी 30 बळी

विदर्भ ट्रॅव्हल्स उलटून पेटल्याने 30 प्रवासी होरपळले - मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महामार्ग म्हणजे देशाच्या प्रदेशाच्या विकासाचे लक्षण. अमेरिकेतील सुबत्ता तिथल्या रस्त्यांमुळे आह असे बोलल्या जाते. अर्थात त्यामुळेच आपल्या देशातही मोठमोठे, गुळगुळीत आणि भरधाव वेगाने प्रवास करता यावे असे महामार्ग निर्माण होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या स्वप्नातील मार्ग म्हणजेच नागपुर ते मुंबई 18 तासात प्रवास करून देणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. हा महामार्ग जनतेला कमीत कमी वेळेत मुंबईला जोडण्यासाठी बांधण्यात आला मात्र ह्या महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचा प्रवास नागपुर ते मुंबई आहे की नागपुर ते यमलोक आहे असा प्रश्न निर्माण होत असून ह्या महामार्गावर अपघातांची शृंखला तुटता तुटत नाहीये.

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने काल रात्री बळींचा उच्चांक गाठला असुन एकच अपघातात तब्बल 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. प्राप्त माहितीनुसार नागपुर वरून पुण्याला जाणाऱ्या खाजगी विदर्भ ट्रॅव्हल्सचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ मध्यरात्री 1:30 वाजताच्या दरम्यान भिषण अपघात झाला असून ह्या अपघातात 30 प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नागपुर येथुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या खाजगी विदर्भ ट्रॅव्हल्सचे चाक पिंपळखुटा जवळ अचानक फुटल्याने बस अनियंत्रित होऊन महामार्गावर उलटली. भरधाव वेगाने असलेली बस उलटून सिमेंट रस्त्याला घासून बरीच पुढे गेल्याने घर्षणामुळे उडालेल्या तिडक्या डिझेल टाकीच्या संपर्कात आल्याने मोठा भडका उडाला. ह्यामुळे संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी सापडली. दरम्यान मध्यरात्री साखरझोपेत असलेल्या प्रवाशांना सावरायला अथवा स्वतःला वाचवायला देखिल वेळ मिळू न शकल्याने तब्बल 30 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर उर्वरित प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

वास्तविक बघता ह्या महामार्गावर सुरुवातीपासूनच अपघातांची मालिका सुरू असून महामार्गावर प्रवास करताना वाहनांची योग्य ती देखभाल करणे अत्यावश्यक असते. वाहनांची चाके सुस्थितीत असणे अनिवार्य आहे तसेच वाहने भरधाव वेगाने पळत असल्यामुळे चाकात साध्या हवेऐवजी नायट्रोजन वायु भरावा, रोड हिप्नोटीझम होण्याची शक्यता गृहीत धरून दर दीड ते दोन तासाने अथवा 200 किमी च्या दरम्यान प्रवास झाल्यानंतर निदान 10 मिनिटे चालकाला विश्रांती मिळावी दरम्यान चालकाने वाहनातून बाहेर निघुन थोडा वेळ डोळ्यांना आराम द्यावा असे वारंवार सांगितले जात असले तरी गतीचा नाद व आपल्या चालक क्षमतेवर असलेला अतीआत्मविश्वास अशा अपघातांना निमंत्रण देत असुन ह्या अपघातात झालेल्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? व भविष्यात अपघात होऊ नये ह्यासाठी काय उपाययोजना करणार असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये