Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

तालुका चाचपडतोय अंधारात महावितरण कर्मचारी गुंग जुगारात – कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच मांडला रमीचा डाव

जुगारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? नागरिकांचा सवाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

संतोष इंद्राळे जिवती

महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या महावितरणच्या कार्यालयात कर्तव्यावर असलेले कर्मचारी चक्क जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असुन दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते भुषण फुसे ह्यांनी ह्याच कार्यालयात नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे आंदोलन करून तोडफोड केल्याचे प्रकरण ताजे असतानाच जुगाराचा प्रकार उघड झाल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.

प्राप्त माहितीनुसार येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयात, अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून ड्युटीवर तैनात कर्मचारी चक्क जुगार खेळत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्या कार्यालयात बसून जनतेचे प्रश्न सोडवायचे त्याच कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून ऑन ड्युटी मुख्य तंत्रज्ञ रवींद्र गंधारे हे आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत बसून जुगार खेळत असताना कॅमेऱ्यात कैद झाले असुन त्यांच्या रमीच्या डावाचा व्हिडीओ जिवती तालुक्यात समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तालुक्यात अगोदरच महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. नागरिक वारंवार बंद होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे हैराण आहेत. वारंवार तक्रार करूनही कर्मचारी वेळेत खंडित विद्युत पुरवठा सुरू करीत नाही, वारंवार तक्रार केल्यानंतर ग्राहकांवर उपकार केल्याची भावना मनात ठेऊन वाटेल तेव्हा तक्रारीचा मागोवा घेतला जातो यामागचे खरे कारण कर्मचाऱ्यांना जुगाराचा जडलेला मोह आहे की काय अशी भावना आता व्यक्त होऊ लागली आहे.

जिवती हा तालुका अतिदुर्गम व आदिवासी बहुल भाग असल्याने या भागात महावितरणच्या अनेक समस्या असतांना व त्यातच ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांचा पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे महावितरणची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे भविष्यात महावितरण कार्यालय जुगाराचा अड्डा तर होणार नाही ना? असा प्रश्न हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून उपस्थित होत असुन कार्यालयातच पत्त्यांचा डाव मांडणाऱ्या जुगारी कर्मचाऱ्यांवर महावितरण काय कारवाई करते ह्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कर्मचाऱ्यांनी जुगाराचा डाव मांडला आहे. कर्तव्यावर असलेले कर्मचारी जुगार खेळत आहेत. कार्यालयात हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जूगारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये