ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी कायदा व सुव्यवस्थाचे भान ठेवावे – पोलीस निरीक्षक संतोष महल्ले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येत असतात. त्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवावे तसेच देशाविषयी प्रेम जागृत ठेवावे, असे प्रतिपादन देऊळगावराजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी केले. श्री व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थी विकास समिती द्वारा आयोजित दीक्षारंभ उद्घाटन समारोहामध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे अधीसभा सदस्य प्रा. डॉ. संतोष कुटे, श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांची उपस्थिती होती. उद्घाटन समारोहासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते.

उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना डॉ. संतोष कुटे यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास कायम ठेवावा तसेच आई-वडिलांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. फक्त डोळे असून चालत नाही तर आपल्यामध्ये दृष्टिकोन विकसित व्हावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

राजे विजयसिंह जाधव यांनी विद्यार्थ्यांनी जीवनाचा पाया शिक्षणाच्या माध्यमातून पक्का करावा, असे आवाहन केले. दिवसेंदिवस आपल्याविषयीची पालकांची जबाबदारी कमी होत जाईल तेव्हा विद्यार्थ्यांनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे वाक्य कायम लक्षात ठेवावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी व्यासपीठ धैर्य अवगत करून प्रश्न विचारणे शिकले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

या दीक्षारंभ कार्यक्रमामध्ये पुढील तीन दिवस विविध विषयाचे शिक्षक व समिती प्रमुख यांनी त्यांच्या विषयाचे महत्त्व व समितीचे कामकाज आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, स्पर्धा परीक्षा, एनसीसी, एनएसएस असे विभाग विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन कोणकोणते उपक्रम राबवतात याविषयी तसेच ग्रंथालय विभाग, खेळ व क्रीडा विभाग राबवत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

दीक्षारंभ कार्यक्रमामध्ये राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपण ज्ञान शोषून घेणारे ‘स्पंज’ व्हायला हवे, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात वावरताना शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे, शिक्षकांचा आदर करावा तसेच महाविद्यालयातील विविध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

या दीक्षारंभ उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले यांनी केले, प्रास्ताविक समन्वयक प्रा. गोविंद ढगे यांनी तर अतिथी परिचय प्रा. मधुकर जाधव यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार डॉ. रूपाली तेलगड यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रा. रवींद्र गणबास यांच्यासह प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील प्रथम वर्षाचे विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये