ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांद्रयानची ऐतिहासिक मोहिम यशस्वी करण्याच्या सहभागात हिंगणघाटची कोमलता !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 असंख्य पणत्यांच्या पंक्तीत उफाळून उठणारी आणि अंगभूत बुद्धिमत्तेने उठून दिसणारी एक ज्वाला आपल्याही गावात आहे हे कधी कोणाला कळलेच नाही.

मिणमिणत्या पणत्यांच्या प्रकाशात एखाद्या ज्वालेचे दर्शन व्हावे आणि लख्ख प्रकाशात एखाद्या चिमुकल्या निर्झराचे विशाल सरितेत रूपांतर व्हावे आणि तिच्या पाण्याने अवघी भूमी सस्यशामल दिसू लागावी तसं आज झालं.

काही तरी अपूर्व,प्रेरक,आणि उदात्त पाहत आणि ऐकत असल्याचा आनन्द मला लाभला तसाच तो तुम्हालाही लाभेल.

…..तर वाचा मित्रानो आपल्या छोट्याशा गावातील एका बुद्धिमान मुलीची थोडक्यात गाथा. ह्या आभाळभर उंची लाभलेल्या कोमलच्या यशाचे वर्णन करण्यासाठी माझी प्रतिभा असमर्थ आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रावर यशस्वीपणे पाठविलेल्या चांद्रयान-3 च्या यशस्वी अभियानात हिंगणघाटच्या मातीत जन्मलेल्या एका शास्त्रज्ञ कन्येचाही हात असून या भूमीकन्येवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

समस्त वैदर्भीय जनतेला अभिमान वाटावा अशी ही कन्या येथील व्यापारी स्व.नंदकिशोर करवा यांची कन्या.बालपणीच पितृछत्र हरपलेल्या या मुलीचा सांभाळ तिची आई श्रीमती संतोषजी करवा यांनी तळहाता वरील फोडा प्रमाणे केला.कोमलच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले.आई व काका सरस्वती कृषी केंद्रचे संचालक श्री नारायण करवा व श्री ब्रिजमोहन करवा,तसेच अभियंता भाऊ गणेश करवा यांच योगदान व तिची तल्लख प्रतिभा या जोरावर या पोरीने आपल्या कुळाचे व गावाचेही नाव कायम इतिहासात अजरामर करून ठेवले आहे.
शालेय जीवनापासूनच अतिशय हुशार असलेल्या कोमलने येथील जी बी एम एम विद्यालयातून गुणवत्ता यादीत १२ वी उत्तीर्ण केल्यानन्तर तिने बी ई गुरू गोविंदसिंग कॉलेज नांदेड येथील शासकीय महाविद्यालयातून येथून प्रथम श्रेणीत केले.त्यानंतर एम टेक एन आय टी अलाहाबाद येथून सुवर्णपदकासह उत्तीर्ण केले.

या उच्चशिक्षणानंतर ती 2017 साली भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो) येथे अभियंता म्हणून रुजू झाली. त्यापूर्वी झालेल्या परीक्षेत संपूर्ण भारतातून 11 व्या रँकने उत्तीर्ण झाली. सद्या ती शास्त्रज्ञ एस.डी.ह्या पदावर इस्रोत कार्यरत आहे.तीन वर्षापूर्वी तिचा विवाह जालना येथील योगेश लोहिया यांच्या सोबत झाला.तिचे पती योगेश हे मॅनेजमेंट कॉन्सल्टंट असून बेगलोर येथे एका खासगी कँपनीत कार्यरत आहेत.

या चांद्रयानच्या दोन्ही मोहीमेत एक अभियंता म्हणून तिची सक्रिय भूमिका होती.

हिंगणघाट सारख्या छोट्याशा शहरातील युवतीने भारतातील जगप्रसिद्ध संस्थेत स्वकर्तृत्वावर मोहर उमटविणाऱ्या सौ कोमल योगेश लोहिया (पूर्वाश्रमीची कु कोमल नंदकुमार करवा) हिच्या कर्तबगारीवर बोलायला लिहायला शब्दच अपुरे आहेत.

कसे उत्तुंग वादळ
तुझ्या मुठीत मावले
मोठा असुनी मुली मी
तुझी वंदितो पाऊले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये