ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पांदण रस्त्यासाठी शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जेसीबीचा मार्ग!

कोरंबी येथील प्रकार ; स्वप्नील शेंडे यांची न्यायासाठी धडपड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदण रस्त्याची सुविधा मिळावी, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असताना दुसरीकडे पांदण रस्त्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र कोरंबी येथे समोर आले आहे. पांदण रस्त्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी चक्क शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जेसीबी चालविण्यात आल्याचा प्रकार घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

कोरंबी येथील शेतकरी स्वप्नील शेंडे हे पांदण रस्त्याच्या प्रश्नावरून न्याय मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. शेती हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यास शेतीची मशागत, पेरणी, फवारणी तसेच शेतमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात शेतापर्यंत पोहोचणे कठीण होते. अशा परिस्थितीत पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते.

 मात्र, कोरंबी येथे या प्रश्नाने वेगळेच वळण घेतले आहे. पांदण रस्त्यासाठी शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जेसीबी चालविण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

एकीकडे शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेले पीक वाचविण्याची धडपड करायची आणि दुसरीकडे शेतात जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या घटनेची योग्य चौकशी करून शेतकऱ्याच्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करावी, तसेच पांदण रस्त्याचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्वप्नील शेंडे यांची न्यायासाठी सुरू असलेली धडपड आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष वेधणारी ठरत आहे. संबंधित महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करावी आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

पांदण रस्ता हा शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी असतो; मात्र त्यासाठी शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे नुकसान होत असेल, तर या प्रकरणात प्रशासनाने नेमकी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये