ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरच्या आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी आ. जोरगेवार यांची आरोग्यमंत्री यांची भेट

महिला रुग्णालय तातडीने सुरू करा, ३० खाटांची ग्रामीण रुग्णालये ५० खाटांची करा, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबईत भेट घेऊन मांडले आरोग्यविषयक प्रश्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण व्हावे, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई दौर्यादरम्यान राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्यविषयक विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमधील त्रुटी दूर करून प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.

   चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलिक व्याप्ती आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य सुविधांवर मोठा ताण आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना अनेकदा उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची क्षमता वाढविणे, आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य यंत्रणेतील प्रलंबित प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचे आमदार जोरगेवार यांनी आरोग्य मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.

   यावेळी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाला आरोग्य मंत्री यांनी आगामी चंद्रपूर दौर्यात प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या भेटीदरम्यान रुग्णालयांमधील उपलब्ध सुविधा, पायाभूत व्यवस्था, रुग्णांना मिळणार्या सेवा आणि आवश्यक सुधारणांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी भूमिका आमदार जोरगेवार यांनी मांडली.

  चंद्रपूर शहरातील महिला रुग्णालयाचा विषयही त्यांनी प्राधान्याने उपस्थित केला. महिलांना प्रसूती, स्त्रीरोग आणि इतर आवश्यक उपचारांसाठी स्वतंत्र व सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे चंद्रपूर येथील महिला रुग्णालय लवकरात लवकर सुरू करून महिलांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचारांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

   यासोबतच जिल्ह्यातील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांची क्षमता वाढवून ती ५० खाटांची करण्याची मागणीही आमदार जोरगेवार यांनी केली. ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सध्याच्या खाटांची संख्या अपुरी पडत असून, रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रुग्णालयांची क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

   आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून, आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनस्तरावर ठोस आणि सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये