फ्रेशर्स सोहळ्याने नर्सिंग सेवेच्या प्रवासाची नवी सुरुवात
कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये बी.एस्सी. नर्सिंग व जी.एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत ; नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ इन्फंट जिजस सोसायटी, राजुरा द्वारा संचालित कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राजुरा येथे बी.एस्सी. नर्सिंग प्रथम सत्र आणि जी.एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘फ्रेशर्स स्वागत सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत, त्यांच्या कलागुणांना वाव आणि महाविद्यालयीन जीवनाशी परिचय करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव तथा राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी नर्सिंग क्षेत्रातील परिचारिकांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला. “रुग्णसेवा हे केवळ करिअरचे साधन नसून ती मानवतेची सेवा आणि सामाजिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. नर्सिंग क्षेत्रात ज्ञानासोबतच संवेदनशीलता, संयम, जिद्द आणि प्रामाणिकपणा या गुणांना विशेष महत्त्व असून विद्यार्थ्यांनी समर्पित भावनेने शिक्षण पूर्ण करून रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाप्रती आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना नर्सिंग शिक्षणातील विविध पैलूंची माहिती देत मार्गदर्शन केले. नर्सिंग क्षेत्रात शिस्त, रुग्णांशी प्रभावी संवाद, प्रात्यक्षिक ज्ञान आणि सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून श्रीनिवास आणि रितू या परीक्षकांनी जबाबदारी पार पाडली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे, कलागुणांचे आणि सादरीकरण शैलीचे त्यांनी कौतुक केले. गायन, नृत्य तसेच विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडविले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत, मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत यामुळे संपूर्ण सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



