घरकुलच्या रोजगार हमी योजनेअंतर्गतचे पैसे मिळेना…!
घडोली गावातील ग्रामस्थांचा "बिडीओ"च्या दालनात ठिय्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
रोजगार सेवकावर कारवाई करण्याची लाभार्थ्यांची मागणी
गोंडपिपरी :- पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत येणाऱ्या घडोली गावातील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 13) बिडिओच्या दालनात ठिय्या मांडला. घरकुल मंजूर आहे आणि घरकुलचे बांधकाम देखील पूर्ण झाले, मात्र रोजगार हमी योजना विभागातून मिळावयाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने लाभार्थ्यांनी एकच रोष व्यक्त केला. चौकशी करून रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी लावून धरली.
गोंडपिपरी तालुक्यात सर्वच ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. कुठे खोदकाम झालेले दिसते तर कुठे सज्जा लेवल तर कुठे स्लॅब लेव्हल घर बांधकाम झाल्याचे चित्र आहे. तर अनेक घरांचे बांधकाम पूर्णत्वास आलेले आहे.
घरकुल बांधकाम चालू असताना रोजगार हमी योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने बांधकामाच्या प्रगतीपथानुसार लाभार्थीसह काम करणाऱ्या व्यक्तींच्या खात्यात पैसे टाकले जातात. रोजगार हमी विभागाच्या मार्फतीने पूर्वी 18 हजार रुपये मिळायचे. आत्ता 28,500 रुपये लाभार्थ्यांना देय आहे.असे असताना मात्र अनेक गावात रोजगार सेवकांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.
असाच काहीसा प्रकार घडोली गावात घडला. रोजगार सेवकाच्या आडमुठ धोरणामुळे त्रस्त होऊन मंगळवारी घडोली येथील घरकुल लाभार्थ्यांनी पंचायत समिती आवारात ठिय्या मांडला. यावेळी उपस्थित झालेल्या शेकडो लाभार्थ्यांनी रोजगार सेवकाची प्रशासनापुढे लेखी तक्रार करत आपले गाऱ्हाणे मांडले.
घडोलीतील रोजगार सेवकानी घरकुल लाभार्थ्यांच्या ऐवजी स्वतःच्या आणि मर्जीतल्या लोकांच्या खात्यात पैसे वडते केल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. यामुळे गावातील अनेक लाभार्थ्यांना रोजगार हमीचे पैसे अद्याप मिळालेले नाही. यामुळे एकीकडे दुष्काळ आणि सणासुदीच्या काळात फसवणूक झाल्याने रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी यावेळी लाभार्थ्यांनी केली आहे.
यावेळी शिष्टमंडळामध्ये ज्ञानेश्वर शेंडे, जितेंद्र चटारे, मीराबाई भोयर, सुभाष गद्देकर, रमेश हुलके, निर्मला नेवारे यांच्यासह गावातील घरकुल लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
हा प्रकार गंभीर आहे. चौकशीत दोषी आढळल्यास रोजगार सेवकावर कारवाई करू.
नितेश दुर्योधन,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,(रो.ह.यो.) पं.स.गोंडपिपरी.



