मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या पाच फरार आरोपींचा शोध सुरू
आरोपींना २७ ऑक्टोबरपर्यंत हजर राहण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ रामनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुखासह पाच आरोपींचा शोध सुरू आहे. संबंधित आरोपींनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी विशेष न्यायालय (मकोका) तथा अतिरिक्त सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे हजर राहावे, यासाठी न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ८४ अन्वये उद्घोषणापत्र जारी केले आहे.
रामनगर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ४४१/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, १९६०, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील फरार आरोपींमध्ये १) इमरान बब्बू शेख ऊर्फ इमरान कुरेशी (वय ३८ वर्षे, रा. वॉर्ड क्र. ४, नरेश टॉकीज जवळ, गडचांदूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर), २) सादीक खान नवाब खान ऊर्फ सादीक कुरेशी (वय ३९ वर्षे, रा. वॉर्ड क्र. ४, अमलनाला रोड, इरिगेशन कॉलनी, गडचांदूर, ता. कोरपना), ३) वसीम रज्जाक कुरेशी (वय ३३ वर्षे, रा. बबलू किराणा दुकानाजवळ, रयतवारी कॉलरी, चंद्रपूर), ४) सोहेल शेख अहमद शेख (वय २३ वर्षे, रा. महागाव, वांकडी, पोस्ट बाम्बरा, जि. कोमरामभीम, तेलंगणा) आणि ५) निजाम हमीद शेख ऊर्फ आवेश कुरेशी (वय २२ वर्षे, रा. वॉर्ड क्र. ४, लक्ष्मी टॉकीजच्या मागे, गडचांदूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे.
सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून तपास यंत्रणेला उपलब्ध झालेले नाहीत. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याने विशेष न्यायालय (मकोका) तथा अतिरिक्त सत्र न्यायालय, चंद्रपूरचे न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम ८४ अन्वये उद्घोषणापत्र जारी केले आहे.
त्यानुसार संबंधित पाचही आरोपींनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे. फरार आरोपींचा ठावठिकाणा किंवा त्यांच्याबाबत कोणतीही विश्वसनीय माहिती असल्यास नागरिकांनी रामनगर पोलिस ठाणे, चंद्रपूर येथे माहिती द्यावी, असे चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी कळविले आहे.



