वन कंत्राटी मजुरांना न्याय मिळणार – आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन
भाजपा कामगार मोर्चाची उपवनसंरक्षक यांच्यासोबत यशस्वी चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर :_ वन विभागाच्या वाहतूक आणि विपणन विभाग, बल्लारशाह येथील कंत्राटी कामगारांनी त्यांच्या चार महिन्यांच्या प्रलंबित वेतन आणि इतर सुविधांसाठी भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांची भेट घेतली.
विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अजय दुबे यांनी तातडीने माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यावर आमदारांनी आश्वस्त केले की कामगारांना नक्कीच न्याय मिळेल आणि त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य व प्रयत्न केले जातील.
कंत्राटी वनमजुरांच्या प्रश्नांवर आज भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांची उपवनसंरक्षक अविनाश कुमार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी सांगितले की सर्व मजुरांच्या थकीत वेतनाबाबत शासन स्तरावर सतत पत्रव्यवहार सुरू आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी (PF), ESIC आणि साप्ताहिक सुट्टीबाबत येत असलेल्या तक्रारींची चौकशी केली जाईल. विभागातील माथाडी कामगारांच्या मानवी आणि सुरक्षा विषयक सर्व गरजा पूर्ण केल्या जातील.
उल्लेखनीय आहे की, विभागाच्या बल्लारशाह आणि आलापल्ली मिळून शेकडो कामगारांचे वेतन जवळपास पाच महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बल्लारशाह आणि आलापल्ली येथील कंत्राटी वनमजूर गेल्या एक आठवड्यापासून कामबंद संपावर आहेत. यापैकी यशस्वी चर्चेनंतर बल्लारशाहच्या मजुरांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीला भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख करीम आणि राम मिलन यादव हे प्रमुख उपस्थित होते.



