ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विरुरच्या गॅस एजन्सीच्या अनियमित कारभाराने ग्राहक त्रस्त

सिलेंडरअभावी चुलीवर स्वयंपाकाची वेळ ; उज्ज्वला लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ राजुरा तालुक्यातील विरूर (स्टेशन) येथून गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव, पाचगाव, परसोडी, कुडेसावली, आर्वी, वेजगांव, सरांडी, लाठी या बहुतांश भागात गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या संबंधित गॅस एजन्सीच्या अनियमित कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. सिलेंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने अनेक कुटुंबांवर गॅसअभावी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबांना स्वयंपाकाचा धूरमुक्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी गॅस जोडण्या देण्यात आल्या. सदर जोडण्या विरुरच्या गॅस एजन्सीला देण्यात आले होते. गोंडपिपरी तालुकासह राजुरा, कोरपना तालुक्यात पण ह्याच एजन्सी ने जोडण्या दिल्या आहेत.

मात्र, संबंधित एजन्सीकडून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सिलेंडर देताना शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा ₹50 ते ₹80 अधिक रक्कम घेतली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, ग्राहकांचे शोषण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सिलेंडरची मागणी करूनही वेळेवर पुरवठा होत नसल्याच्या तक्रारीही ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. अनेकदा सिलेंडरसाठी ग्राहकांना एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगण्यात येते. ग्रामीण भागातील गरीब आणि मजूर कुटुंबांना याचा मोठा फटका बसत आहे.

उज्ज्वला योजनेचा उद्देश गोरगरीब महिलांना धुरापासून मुक्त करून स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा असताना, गॅसच्या अनियमित पुरवठ्यामुळे या योजनेचा उद्देशच बाजूला पडत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे.

दरम्यान, संबंधित एजन्सीच्या कारभाराची चौकशी करून सिलेंडरचा नियमित पुरवठा सुरू करावा, ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारींची तपासणी करावी आणि दोष आढळल्यास संबधित गॅस एजन्सी वर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.

विरूरच्या गॅस एजन्सी कडून ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क व वेळेवर सिलेंडर पुरविण्यात अनिमियत्ता असल्याचे तक्रारी आल्या असून लवकरच चौकशी करून ग्राहकांचे बयान घेऊन गॅस एजन्सी वर कार्यवाही करू 

           *ओमप्रकाश गोंड तहसीलदार राजुरा*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये