महापांढरवाणी येथे आधार अपडेटेशन शिबिर संपन्न
नेटवर्कअभावी ७० पैकी केवळ ९ ग्रामस्थांचे आधार अपडेट; बीएसएनएल प्रशासनाकडे तातडीने नेटवर्क सुरळीत करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील महापांढरवाणी येथे ग्रामस्थांच्या सोयीसाठी आयोजित करण्यात आलेले आधार अपडेटेशन शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. मात्र, गावात बीएसएनएलचा टॉवर उपलब्ध असूनही नेटवर्कची समस्या कायम असल्याने शिबिरासाठी उपस्थित सुमारे ७० लाभार्थ्यांपैकी केवळ ९ ग्रामस्थांचेच आधार अपडेटेशन पूर्ण होऊ शकले. त्यामुळे “टॉवर असूनही नेटवर्क नाही” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
गट विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके तसेच तहसीलदार रूपाली मोगरकर यांच्या आदेश व सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आधार केंद्राचे जयंत गोतावळे व राजेश पवार यांनी आधार अपडेटेशनचे काम केले. तर संभा पेंदोर, जंबु पेंदोर व जंगु कोटनाके यांनी नावनोंदणीची जबाबदारी सांभाळली.
शिबिरासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिल्याने आधार अपडेटेशनची गरज अधोरेखित झाली. मात्र, इंटरनेट व नेटवर्कच्या वारंवार निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेक लाभार्थ्यांना सेवा मिळू शकली नाही. गावात बीएसएनएलचा टॉवर असतानाही त्याचा अपेक्षित उपयोग होत नसल्याने संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन नेटवर्कची समस्या दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी स्मार्ट ग्रामपंचायत मंगीचे समाजसेवक तथा सेवानिवृत्त शिक्षक परशुराम तोडासाम व शरद पुसाम यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच येरमी येसापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम यांनी आधार अपडेटेशन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला येरमी येसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच जंगू कोटनाके, गावपाटील मानकू धुर्वे, रोजगार सेवक केशव कुमरे, तसेच तुकाराम धुर्वे, अनिल आडे, सीताराम आडे, संभा पेंदोर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अनिता धुर्वे यांनी महिलांना आधार अपडेटेशन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
सदर मार्गदर्शन सभेचे सूत्रसंचालन भुजू सिडाम यांनी केले. दरम्यान, बीएसएनएल टॉवरच्या नेटवर्क समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. नेटवर्कची समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आधार अपडेटेशन शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले. मात्र, नेटवर्कअभावी अनेक लाभार्थी या सुविधेपासून वंचित राहिले. त्यामुळे बीएसएनएल प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून महापांढरवाणी गावातील नेटवर्क सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.



