स्वयंशासन दिनासह शिक्षक दिन व रक्षाबंधन उत्साहात
सुपगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा स्त्यूत उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुपगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत स्वयंशासन दिन हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांच्या भूमिका साकारत अध्यापनासह शालेय प्रशासनाची जबाबदारी सांभाळली.
विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे अध्यापन आत्मविश्वासाने केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, शिस्त, जबाबदारीची जाणीव व प्रशासकीय कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव विकसित झाला.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वरभाऊ नागापुरे, उपाध्यक्ष मनिषाताई मंडरे, सदस्य विकासभाऊ नागापुरे, किशोरभाऊ घोगरे, प्रकाशभाऊ तालापेल, विनोद घोगरे व नितीनभाऊ भोयर उपस्थित होते. मुख्याध्यापक आनंद कोंडेवाड व शिक्षक मंगेश पेंदाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका संतोषी पेटकर व स्वयंसेविका तेजस्विनी नागपुरे यांनी सहकार्य केले.
शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून आकांक्षा किशोर घोगरे (इयत्ता ५वी), कृष्णा किशोर घोगरे व विजय रामदास चौधरी (इयत्ता ७वी) हे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्वयंशासन दिनाचे नियोजन राशी नागपुरे, युती जुनघरे व आकांक्षा घोगरे यांनी केले. संचालन आयुष चौधरी तर आभार रागिणी घ्यार हिने मानले.
*गुरू _ शिष्यांचे रक्षाबंधन*
शाळेमध्ये रक्षाबंधन कार्यक्रमही उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींनी शिक्षकांना, तर विद्यार्थ्यांनी एकमेकांना राख्या बांधून स्नेहबंध जपला. यामुळे गुरु _ शिष्यांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण झाले.



