ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोकाट जनावरांचा बंदोबस्त; योजना चांगली, मात्र अंमलबजावणीत विपर्यास

दुभती जनावरे गोशाळेत, पाडसांचा घरात टाहो : सामाजिक कार्यकर्ते सूरज शहा यांचे ठिय्या आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर परिषद भद्रावतीने १ सप्टेंबरपासून अधिकृत जाहीर सूचना देत नागरिकांनी आपली पाळीव जनावरे मोकाट सोडू नयेत, असे आवाहन केले होते. मोकाट आढळणारी जनावरे जैन मंदिर, भद्रावती येथील गोशाळेत दाखल करण्यात येतील तसेच ती परत मिळणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला होता. या निर्णयानुसार नगर परिषदेने कारवाई सुरू केली असली तरी चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंमलबजावणीमुळे जनहिताची योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

कारवाईदरम्यान काही ठिकाणी दुभती जनावरे गोशाळेत नेण्यात आली, तर त्यांची पाडसे घरातच राहून टाहो फोडत असल्याचे हृदयद्रावक चित्र समोर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या चांगल्या उद्देशाच्या योजनेचा अंमलबजावणीतील विपर्यास होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

या प्रकाराचा निषेध नोंदवत सामाजिक कार्यकर्ते सूरज शहा यांनी पीडित कुटुंबासह नगर परिषद भद्रावतीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी व नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला.

“अन्याय सहन करणार नाही. आधी नगर परिषदेने अधिकृत कोंडवाडे तयार करावेत आणि त्यानंतरच मोकाट जनावरांवर कारवाई करावी. प्राणिमात्र तसेच पशुमालकांवर एकतर्फी कारवाई करून एकाधिकारशाही लादणे थांबवावे,” अशी मागणी सूरज शहा यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी “अधिकारी व लोकप्रतिनिधी असल्याचा माज खपवून घेतला जाणार नाही,” असा इशाराही दिला. मोकाट जनावरांचा प्रश्न निश्चितच गंभीर असून त्यावर ठोस व मानवीय उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र कारवाई करताना दुभती जनावरे, त्यांची पाडसे तसेच पशुपालकांच्या अडचणींचाही विचार करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

दरम्यान, नगर परिषदेच्या या कारवाईबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, तसेच गोशाळेत नेण्यात आलेल्या जनावरांच्या देखभालीची व मालकांना जनावरे परत मिळण्याबाबतची नेमकी व्यवस्था काय आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये