प्रभागनिहाय वर्धा शहराच्या सर्वांगीण विकासावर भर – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
प्रभागनिहाय विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ; घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपरिषदेला वाहने देणार
वर्धा :_ शहराचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपरिषदेस प्रत्येक गोष्टीत सहकार्य केले जात आहे. नगरपरिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी देखील पुढाकार घेऊन शहराच्या विकासात योगदान देणे आवश्यक आहे. शहराच्या प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास व्हावा, अशी आमची भावना आहे. त्यामुळे विकासकामांचा प्रभागनिहाय एकत्रित प्रस्ताव सादर करा. यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
वर्धा शहराचा विकास, प्रलंबित विषय व अपेक्षित बाबींवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर तसेच नगरपरिषदेचे सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
शहरात अंडरग्राऊंड ड्रेनेज व पाणी पुरवठ्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. ठिकठिकाणी या व्यवस्थेत अडचणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटदार, सल्लागार व नगरपरिषदेने प्रभागनिहाय पाहणी करून यात काही त्रूट्या असतील तर त्याची पाहणी करावी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करता यावी, यासाठी आपण शहरात ठिकठिकाणी वाचनालये सुरु केली. ही वाचनालये नियमित सुरु राहण्यासोबतच त्याची देखभाल व्यवस्थित होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या योजनेतून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपरिषदांना निधी उपलब्ध करून दिला जातो. यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे प्रस्ताव घेऊन शासनास सादर करावे. मिशनमधून जास्तीत जास्त निधी नगरपरिषदांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. शहरात दिवसेंदिवस वर्दळ, वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रमुख चौक अतिक्रमणमुक्त असणे आवश्यक आहे. तसेच अनावश्यक ठिकाणी फेरीवाले आपल्या गाड्या लावून वाहतूक अडथळा निर्माण करणार नाही, अशी व्यवस्था नगरपरिषद व पोलिस विभागाने संयुक्तपणे निर्माण करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
मोकाट जनावरे, कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नगरपरिषदेने कायमस्वरुपी यंत्रणा उभी करावी. मोकाट जनावरे पकडतांना काही अडचण येत असल्यास पोलिस विभागाने यासाठी नगरपरिषदेस सहकार्य करावे. शहर किंवा ग्रामपंचायत क्षेत्रातील जनावर मालकांनी आपली जनावरे शहरात फिरणार नाही, याची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना केल्या.
वर्धा शहरात कचरा संकलनासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कचरा रोजच्या रोज उचलून इंझापूर येथे नेणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहने अपुरी असल्याने अजून 20 वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी काही नगरसेवकांनी केली. त्यामुळे आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यात येतील. कचरा संकलन व इंझापूर येथे कचरा विल्हेवाटीसाठी एवोनिथचे सहकार्य लाभणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
आयुष्मान भारत कार्ड धारक नागरिकांना 5 लाखापर्यंतचे उपचार विनामुल्य उपलब्ध होतात. ग्रामीण भागात कार्डधारकांची संख्या अधिक आहे. वर्धा शहरात हे प्रमाण वाढविण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन वार्डनिहाय यासाठी शिबिरे घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. यावर्षी वर्धा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पात पुरेसे पाणी साठवणूक झालेली नाही. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी आराखडा करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या.
*विकास कामांसाठी प्रत्येक प्रभागाला निधी*
जिल्हा नियोजन समितीमधून नगरपरिषद क्षेत्राच्या विकासासाठी तीन लेखाशिर्षांतर्गत निधी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी नगरसेवकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांशी समन्वय साधून आपल्या प्रभागातील प्राधान्याची कामे सूचवावी. प्रभागनिहाय सर्व प्रस्ताव एकत्र करून याच आठवड्यात जिल्हा नियोजन समितीस सादर करावे. यावर्षाच्या तरतूदीतून निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
*पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या समस्या, अपेक्षा*
यावेळी पालकमंत्र्यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांकडून प्रभागातील समस्या, अपेक्षा, प्रलंबित बाबी व नव्याने शहरासाठी काय करता येईल, याबाबत त्यांची मते जाणून घेतली. अनेकांनी अतिक्रमण, मोकाट जनावरे, अवैध धंदे, शाळांसाठी सीसीटीव्ही, विकास कामांवर आपली मते व्यक्त केली.



