गांजाची वाहतूक करणारी महिला ताब्यात : भद्रावती पोलिसांची धडक कारवाई
१ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. चंद्रपूरकडून भद्रावतीच्या दिशेने गांजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका महिला आरोपीला पोलिसांनी सायवन हायवे रोडवर नाकाबंदी करून ताब्यात घेतले. या कारवाईत गांजासह मोबाईल फोन आणि सुझुकी मोपेड असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परी. पोलीस उपअधीक्षक सचिन एस. खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अवैध धंद्यांविरोधात कारवाई करीत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली.
गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरकडून भद्रावतीच्या दिशेने हिरव्या रंगाच्या सुझुकी मोपेडवरून एक महिला गांजाची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने सायवन हायवे रोडवर नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान संशयित हिरव्या रंगाची सुझुकी मोपेड पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी मोपेड चालक महिलेस ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता तिच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह संबंधित मोबाईल फोन व वाहने असा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन प्लास्टिक पुड्यांमध्ये गांजा आढळून आला. पहिल्या पुड्यात १ किलो १० ग्रॅम, तर दुसऱ्या पुड्यात १ किलो १६ ग्रॅम गांजा आढळून आला. दोन्ही पुड्यांतील गांजाची अंदाजे किंमत अनुक्रमे २० हजार रुपये असून एकूण गांजाची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याशिवाय निळ्या रंगाचा Apple iPhone 11 मोबाईल, IMEI क्रमांक 351066253319681, अंदाजे किंमत १५ हजार रुपये, तसेच सुझुकी कंपनीची मोपेड क्रमांक MH 34 CS 1752, अंदाजे किंमत ८० हजार रुपये, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गांजा, मोबाईल फोन आणि मोपेडसह एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
या प्रकरणी महिला आरोपीविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात NDPS Act कलम ८(क), २०(ब)(II)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई परी. पोलीस उपअधीक्षक श्री. सचिन एस. खेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, सफौ. महेंद्र, पोलीस हवालदार गोपाल, देवानंद, प्रशांत, अनुप, धर्मराज, पोलीस अंमलदार योगेश, संतोष, खुशाल, किरण, नितीन तसेच महिला पोलीस अंमलदार रागिनी, पूजा, मोनाली आणि भद्रावती पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.



