ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे १३७ कोटींच्या वीर बाबूराव शेडमाके स्टेडियमच्या प्रस्तावाला गती

प्रधान सचिवांनी दिले पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश; चंद्रपूरच्या क्रीडा पायाभूत सुविधांना मिळणार नवे बळ

चांदा ब्लास्ट

‘मिशन ऑलिम्पिक २०३६’साठी चंद्रपूरच्या मातीतून घडणार नवे खेळाडू

चंद्रपूर :_ जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या वीर बाबूराव शेडमाके स्टेडियम, दाताळा येथील १३७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या ठोस पुढाकारामुळे या प्रस्तावाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, श्री. रणजितसिंह देओल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी प्रकल्पाची आवश्यकता, चंद्रपूरच्या क्रीडा विकासातील त्याचे महत्त्व आणि सद्यस्थिती सविस्तरपणे मांडली. यावर प्रधान सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावाची आवश्यक तपासणी व पूर्तता करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मौजा दाताळा, ता. जि. चंद्रपूर येथे प्रस्तावित वीर बाबूराव शेडमाके स्टेडियमसाठी १३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक व आराखडा प्रस्तावित आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून शासनस्तरावर आवश्यक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली.चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्रात मोठी क्षमता आहे. योग्य प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि आवश्यक व्यासपीठ उपलब्ध झाल्यास हे खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपूरचे नाव उज्ज्वल करू शकतात. या पार्श्वभूमीवर स्टेडियमच्या उभारणीचे महत्त्व आ. मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले.

‘मिशन शौर्य एव्हरेस्ट’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आदिवासी युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळाले आहे. या मोहिमेतील पाच आदिवासी युवकांनी एव्हरेस्ट शिखर सर केले होते. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात विशेष उल्लेख करून गौरव केला होता. चंद्रपूरच्या युवकांमध्ये असलेली ही क्षमता योग्य क्रीडा पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आणखी विकसित करता येईल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

प्रस्तावित स्टेडियमच्या माध्यमातून ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’साठी चंद्रपूर जिल्ह्यातील नव्या पिढीतील खेळाडू घडविण्याचे व्यापक उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण व आदिवासी भागातील प्रतिभावान खेळाडूंना प्रशिक्षणाची योग्य संधी मिळेल आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक तयारी करता येईल.बैठकीत प्रधान सचिव श्री. रणजितसिंह देओल यांनी प्रकल्पाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावाची आवश्यक तपासणी व पूर्तता करून प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शासनस्तरावर प्रकल्पाबाबत सकारात्मक व अनुकूल कार्यवाही करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

वीर बाबूराव शेडमाके स्टेडियमची उभारणी झाल्यानंतर चंद्रपूर आणि पूर्व विदर्भातील क्रीडा क्षेत्राला अत्याधुनिक पायाभूत सुविधा मिळतील. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याला योग्य दिशा देण्याची आणि मोठ्या व्यासपीठावर चमकण्याची संधी मिळणार आहे. चंद्रपूरच्या क्रीडा विकासाला नवे बळ देतानाच भावी पिढीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये