ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

CLTC अभियंता निवडीवरून पोंभुर्ण्यात प्रश्नचिन्ह

स्थानिक अभियंत्यांचा प्रक्रियेवर आक्षेप; नव्याने पारदर्शक निवडीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा :- प्रधानमंत्री आवास, रमाई आवास आणि शबरी आवास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या शहरस्तरीय तांत्रिक कक्ष (CLTC) अभियंता निवड प्रक्रियेवर स्थानिक सुशिक्षित बेरोजगार सिव्हिल अभियंत्यांनी आक्षेप घेतला आहे. निवड प्रक्रिया रद्द करून सर्व पात्र उमेदवारांना समान संधी देत नव्याने खुली व पारदर्शक निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत प्रविण हंसराज मानकर, महेश नैताम, राहुल वासेकर, अजय उराडे, शेख यांच्यासह बी.ई. (सिव्हिल) अभियंत्यांनी १४ ऑगस्ट रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, पोंभुर्णा यांच्याकडे निवेदन सादर केले. तहसीलदारांनी हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविले आहे.

CLTC अभियंता पदासाठी दैनिक वृत्तपत्राऐवजी साप्ताहिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा आक्षेप निवेदनातून नोंदविण्यात आला आहे. संबंधित साप्ताहिकाचा पोंभुर्णा शहर व तालुक्यातील प्रसार किती आहे, जाहिरात स्थानिक पात्र अभियंत्यांपर्यंत पोहोचली का आणि सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची समान संधी मिळाली का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

या पदासाठी केवळ दोन अर्ज प्राप्त झाल्याने निवड प्रक्रिया व्यापक आणि स्पर्धात्मक होती का, याची पडताळणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेतही CLTC अभियंता नियुक्ती प्रक्रियेबाबत नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करून निवडीवर आक्षेप घेतल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, प्रशासनाकडून निवड प्रक्रिया रीतसर आणि पारदर्शक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तीनुसार दोन अर्ज प्राप्त झाले असून, त्यामधून पात्र उमेदवाराची निवड करण्यात आल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल लांडगे यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाची भूमिका

“निवड प्रक्रिया रीतसर व पारदर्शक झाली असून, जाहिरातीतील अटी-शर्तीनुसार दोन अर्जांमधून निवड करण्यात आली,” असे मुख्याधिकारी निखिल लांडगे यांनी सांगितले.

एकीकडे प्रशासनाने प्रक्रिया नियमानुसार झाल्याचे स्पष्ट केले असताना, दुसरीकडे स्थानिक अभियंत्यांनी जाहिरात प्रसिद्धीपासून अर्ज छाननी आणि अंतिम निवडीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे CLTC अभियंता निवड प्रक्रियेबाबत आता प्रशासनाकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये