सामंजस्यातून सावखेड भोई–पिंपळनेर शिवरस्ता खुला
शंभरहून अधिक शेतकऱ्यांचा मार्ग सुकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भोई ते पिंपळनेर शिवरस्ता याबाबतचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वाद अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि दोन्ही पक्षकारांच्या सामंजस्यातून मार्गी लागला. आज दिनांक ८ जुलै २०२६ रोजी सदरील शिवरस्ता प्रत्यक्ष ऑन द स्पॉट खुला करण्यात आला.
सदर रस्त्याबाबत यापूर्वीही प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली होती. मागील तहसीलदारांच्या कार्यकाळात रस्त्याची मोजणी करण्यात येऊन रस्ता खुला करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही दोन्ही पक्षकारांमधील वाद पूर्णपणे मिटला नसल्याने रस्त्याचा प्रश्न कायम होता.
सदर प्रकरणाची विद्यमान तहसीलदार, देऊळगाव राजा यांनी दखल घेऊन संबंधित पक्षकारांशी संवाद साधत प्रकरण सामंजस्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार आज तहसीलदार, संबंधित मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व सामंजस्याने सदरील शिवरस्ता जागेवरच खुला करण्यात आला.
या रस्त्याचा परिसरातील किमान १०० शेतकऱ्यांना थेट लाभ होणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ये-जा करण्यासाठी तसेच शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न प्रत्यक्ष जागेवर निकाली निघाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व सामंजस्याने प्रकरणाचा तोडगा निघाल्याबद्दल उपस्थितांनी प्रशासनाचे आभार मानले. तसेच प्रशासनाने निष्पक्षपणे कार्यवाही करून सर्व संबंधितांच्या हिताचा विचार केल्याने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करत सर्वांनी समाधान व्यक्त केले.
प्रशासनाच्या लोकाभिमुख व निष्पक्ष भूमिकेमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला शिवरस्त्याचा प्रश्न सामंजस्याने मार्गी लागून शेतकऱ्यांसाठी वाहतुकीचा मार्ग खुला झाला आहे.



