ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक कॉल, आणि तात्काळ सेवा

भद्रावती पोलिसांचे 'डायल ११२'चे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :- वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी तातडीने आणि एकाच ठिकाणी मदत मिळावी, यासाठी ‘डायल ११२’ ही आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणाली युद्धपातळीवर राबवली जात आहे. “आपल्या सोबत, आपल्या साठी” हे ब्रीद सार्थ ठरवत भद्रावती पोलीस ठाण्याच्या वतीने संपूर्ण तालुक्यात या सुविधेबाबत व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पूर्वी पोलिसांसाठी १००, रुग्णवाहिकेसाठी १०२ आणि अग्निशमन दलासाठी १०१ अशा वेगवेगळ्या क्रमांकांवर संपर्क करावा लागत असे. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन अनेकदा मदतीला उशीर होत असे. हीच अडचण ओळखून शासनाने ‘डायल ११२’ हा एकमेव क्रमांक सुरू केला आहे. भद्रावती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या एकाच नंबरवर खालील प्रमुख सेवा चोवीस तास उपलब्ध राहतील.

महिला सुरक्षा आणि घरगुती हिंसाचार, महिलांवरील अत्याचार, छेडछाड किंवा कौटुंबिक छळाच्या घटनांना आळा घालण्यासाठी तात्काळ विशेष पथक तैनात केले जाईल. रस्ता अपघात आणि वैद्यकीय आणीबाणी, महामार्गावर किंवा अंतर्गत रस्त्यांवर अपघात झाल्यास तात्काळ रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदत पोहोचवली जाईल. गुन्हे नियंत्रण आणि अग्निशमन, चोरी, दरोडा, हाणामारी किंवा आगीची दुर्घटना घडल्यास एकाच कॉलवर पोलीस आणि अग्निशमन बंब घटनास्थळाकडे रवाना होतील.

‘डायल ११२’ ही यंत्रणा अत्यंत गतिमान असून कॉल येताच काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतात. मात्र, काही समाजकंटक किंवा नागरिक या क्रमांकावर विनाकारण, खोटे अथवा खोडसाळ कॉल्स करत असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भद्रावती पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे.

या क्रमांकाचा गैरवापर करणे हा कायद्याने गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. खोटे कॉल्स करून यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्यांवर थेट कायदेशीर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये