ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रश्नावर केंद्राचे स्पष्टीकरण

चंद्रपूरच्या 'परकोटा' परिसरातील १०० मीटर बांधकाम बंदी क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव नाही

चांदा ब्लास्ट
*मनपाने विशेष सवलतीचा प्रस्ताव पाठवण्याची खासदार प्रतिभा धानोरकर यांची सूचना*
चंद्रपूर: चंद्रपूर येथील ऐतिहासिक ‘परकोटा’ परिसरात लागू असलेले १०० मीटरचे बांधकाम बंदी क्षेत्र कमी करून ३० मीटर करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारकडे विचाराधीन नाही. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री श्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी ही माहिती दिली.
चंद्रपूर शहरातील दाट लोकवस्ती आणि स्थानिक नागरिकांना घरांची दुरुस्ती तसेच ‘प्रधानमंत्री आवास योजना’चा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात मंत्र्यांनी परवानगी प्रक्रियेचा तपशील दिला. प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा, १९५८ अंतर्गत सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेऊन प्रतिबंधित क्षेत्रातील पात्र इमारतींची दुरुस्ती/नूतनीकरण आणि नियंत्रीत क्षेत्रात नवीन बांधकाम किंवा दुरुस्तीची परवानगी दिली जाते, असे त्यांनी सांगितले.
ऐतिहासिक वारशाचे जतन आणि नागरिकांचे अधिकार यांच्यात समतोल साधण्यासाठी विशेष सवलत देण्याच्या प्रश्नावर मंत्रालयाने भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण लक्षात घेऊन प्राप्त अर्जांवर ‘केस-टू-केस’ तत्त्वावर विचार केला जातो, कारण या कायद्यांतर्गत चंद्रपूर शहरासाठी किंवा कोणत्याही विशिष्ट शहरासाठी वेगळी विशेष सवलत देण्याची कोणतीही तरतूद नाही, असे मंत्री शेखावत यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर, परकोटा परिसरातील रहिवासी घरे आणि विविध विकास योजनांच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केंद्र सरकारकडे विशेष सवलतीचा सुधारित प्रस्ताव तत्काळ पाठवावा, अशी सूचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. वेळोवेळी मी त्यात स्वतः लक्ष देऊन पाठपुरावा करेल अशी ग्वाही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये