राजुरा-बल्लारपूर महामार्ग आणि शेतकरी प्रश्नांवर खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी सकारात्मक चर्चा
वरोरा-चंद्रपूर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट; कंत्राटदारावर कडक कारवाईसाठी खासदार प्रतिभा धानोरकरांची गडकरींकडे मागणी

चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विशेष निवेदन सादर केले व राजुरा-बल्लारपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या मांडल्या. या सकारात्मक चर्चेनंतर आता या प्रश्नांवर लवकरात लवकर मार्ग निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजुरा-बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग (NH 930-D) आणि राजुरा-हैदराबाद महामार्गाच्या बांधकामामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. राष्ट्रीय महामार्गाची उंची २५ ते ३० फुटांपर्यंत वाढवल्यामुळे मौजा राजुरा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही. एका बाजूला रेल्वे मार्ग आणि दुसऱ्या बाजूला वर्धा नदीचा किनारा असल्यामुळे शेतकरी सर्व बाजूंनी वेढले गेले आहेत. त्यामुळे शेती साहित्य व बैलगाड्यांच्या वाहतुकीसाठी तातडीने अंडरपास आणि सर्व्हिस रोड उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
तसेच वर्धा नदी ते कोतपल्लीवार पेट्रोल पम्पा जवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोडसह राजुरा-बल्लारपूर येण्या-जाण्यासाठी ‘एन्ट्री-एक्झिट पॉईंट’ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व्हिस रोड नसल्यास केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर वर्धा नदीकाठी होणारी छठ पूजा, दुर्गा विसर्जन आणि संमक्का सरक्का यात्रेतील भाविकांनाही मोठा त्रास सहन करावा लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
याशिवाय पावसाळ्यात शेतात पाणी साचू नये यासाठी योग्य ड्रेनेज व्यवस्था, संरक्षक भिंत उभारणे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे तातडीने पालन करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच वरोरा-चंद्रपूर रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने, या कामाची तातडीने तपासणी करून संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असल्याने प्रशासनाने यावर तात्काळ पावले उचलून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी हे मुद्दे मार्गी लावावेत, अशी विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



