ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराजस्व अभियानातून शासकीय योजना लोकांच्या दारात पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

कोरपना येथे आयोजन ; लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- समाजातील शेवटच्या घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे (22 जुलै) औचित्य साधून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या टोकावर असलेल्या कोरपना येथे शुक्रवारी (दि.24) आयोजित महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शासन – प्रशासन लोकांपर्यंत पोहचले आहे. एकाच छताखाली त्यांना योजनांचा लाभ मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या विकासासाठी अविरत झटत आहेत. वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजपयोगी उपक्रम राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहे. त्याच अनुषंगाने संपूर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. राज्य सरकारने नुकतीच सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार असून कर्जमाफी पासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही.

या परिसरात पारधी आणि कोलाम बांधव मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना घेता येईल. शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहचला तरच खऱ्या अर्थाने या महाराजस्व अभियानाचे सार्थक होईल. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या भागात नियमितपणे दौरे करावे. लोकांच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल

पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लक्ष रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्‍य देण्यात येत आहे. राज्य शासनाने अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा, महिलांना शेतकरी दर्जा देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेतून आता आदिवासी महिलांचे बचत गट निर्माण होत आहे, असेही पालकमंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

आमदार देवराव भोंगळे म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून सर्व योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाला वेगळी उंची प्राप्ती करून दिली आहे. देशातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.  शेतकऱ्यांचे वीज बिलही माफ होत आहे. हे सरकार गरिबांसाठी काम करत आहे. जिवतीचे प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते ‘वाचनाचा आनंदोत्सव’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तसेच त्यांनी विविध स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, कोरपनाच्या नगराध्यक्षा नंदा बावणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, बालाजी कदम, तहसीलदार ओमप्रकाश गोंड, गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, नायब तहसीलदार करिश्मा वासेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांनी केले. संचालन सपना पिंपळकर यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी बालाजी कदम यांनी मानले.

लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ : यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुरेश गुंडावार, बंडू सोनटक्के, लक्ष्मी पेंदोर यांना सनद वाटप प्रमाणपत्र, नंदकिशोर बेलेकर, रमेश सिडाम, केशव जगनाके , अमरनाथ मडावी यांना निवासी पट्टे वाटप, महादेव मडावी, रमेश पारखी यांना जिवंत सातबारा प्रमाणपत्र, शीतल माथनकर, भाऊराव कावडकर, सरिता परचाके यांना अंत्योदय कार्डवाटप, संपदा महिला बचत गट, रेणुका बचत गट, राणी लक्ष्मीबाई बचत गट यांना खेळते भांडवल प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरुपात देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये