ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राजुरा येथे परमपूज्य सद्गुरू दादाश्री महाराज यांच्या सानिध्यात गुरुपौर्णिमा पर्व भक्तिभावात साजरा
परमपूज्य सद्गुरू दादाश्री महाराज यांच्या परमपावन सानिध्यात गुरुपौर्णिमा पर्वानिमित्त नक्षत्र सभागृह, राजुरा येथे रविवारी सूक्ष्म ध्यान साधना व महासत्संग कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला.

चांदा ब्लास्ट
राजुरा :- विभागासह परिसरातील शेकडो साधक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुकृपेचा लाभ घेतला. “जय गुरुदेव”च्या जयघोषाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. साधकांच्या चेहऱ्यावर आनंद, डोळ्यांत श्रद्धा आणि अंतःकरणात गुरुभक्तीची भावना स्पष्टपणे दिसून येत होती.
कार्यक्रमाची सुरुवात सूक्ष्म ध्यान साधनेने झाली. ध्यानाद्वारे अनेक साधकांनी मानसिक शांतता, आत्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती घेतली.यानंतर झालेल्या महासत्संगात परमपूज्य सद्गुरू दादाश्री महाराज यांनी गुरु-तत्त्वाचे महत्त्व, नियमित साधना, सेवा, सदाचार आणि आत्मपरिवर्तनाचा मार्ग यावर हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले. जीवनातील प्रत्येक कार्य मनापासून, प्रामाणिकपणे आणि एकाग्रतेने करण्याचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. गुरुकृपेने मनातील भय, चिंता आणि नकारात्मकता दूर होऊन जीवन आनंद, समाधान आणि आत्मविश्वासाने उजळून निघते, असे त्यांनी सांगितले.
गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा पवित्र उत्सव असून, श्रद्धा, साधना, सेवा आणि सदाचाराचा अंगीकार करून जीवन अधिक सुंदर व अर्थपूर्ण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. उपस्थित साधकांनी अधिक निष्ठेने साधना आणि सेवाकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. राजुरा विभागातील साधक कार्यकर्ते व स्वयंसेवकांच्या सेवाभावी योगदानामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेत गुरुभक्तीचा आनंद द्विगुणित केला.



