ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्घाटन होण्याआधीच सुरू गोंडपिपरी तहसील कार्यालयाचा कारभार

कोट्यवधींच्या प्रशासकीय भवनावर निकृष्ट कामाचा संशय ; रखडलेले बांधकाम, सुरक्षेचा प्रश्न आणि चौकशीची जोरदार मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी येथील प्रशासकीय भवनाचे रीतसर उद्घाटन होण्यापूर्वीच तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या प्रशासकीय भवनाचे बांधकाम अजूनही अपूर्णच असून, या ठिकाणी दररोज कामगार काम करताना दिसून येतात. यामुळे तालुक्यातील खेडेगावातून विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासकीय भवनाचे उद्घाटनापूर्वीच तहसील कार्यालयाने आपला कारभार सुरू केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गोंडपिपरी येथे कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय भवनाच्या बांधकामाबाबत नागरिकांमध्ये गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले हे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नसल्याने कामाच्या गतीसह दर्जाबाबतही चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक स्तरावर काही नागरिकांकडून बांधकामात वापरण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त करण्यात येत असून, संपूर्ण कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

सध्या तहसील कार्यालय याच इमारतीत कार्यरत असल्याने दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी येथे ये-जा करतात. मात्र, इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच परिसरात पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचा आरोप होत आहे. प्रवेशद्वाराजवळ लोखंडी पोल, सुरू असलेली कामे आणि तीन मजली इमारतीवरून साहित्य खाली पडण्याची शक्यता यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, इमारतीतील पीओपी, विद्युत साहित्य, फर्निचर आणि इतर अंतर्गत कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. या दाव्यांची सत्यता संबंधित तांत्रिक यंत्रणेकडून तपासली जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शासनाच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या सार्वजनिक इमारतीचे काम निर्धारित निकषांनुसार व दर्जेदार साहित्य वापरूनच झाले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण कामाचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करून बांधकामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य, सुरक्षेचे निकष आणि कामातील विलंब यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. चौकशीत जर कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा, निकृष्ट दर्जाचे काम किंवा नियमांचे उल्लंघन आढळून आले, तर संबंधित ठेकेदार तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये