वढोली-अंधारी नदीत मालवाहू वाहन कोसळले
चौघे जखमी,जीवितहानी टळली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील वढोली-अंधारी नदीवरील पुलाजवळ शनिवारी (दि. ४) रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास एक मालवाहू वाहन (क्र.एम.एच.३६ ए. ए. ४५०२) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल ३० फूट खोल नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली. या अपघातात वाहनातील चौघेजण जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख फैजान, तफसीर खान, भीमा रामटेके आणि संदीप हजारे हे नागपूरहून तेलंगणाकडे मालवाहू वाहनाने बॅनर फ्रेम घेऊन जात होते. वढोली-अंधारी नदीवरील पुलाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट नदीत कोसळले.
माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे वाहनातील चौघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना तातडीने गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती. वेळेत मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.



