नात्यातील “लाडक्या बहिणीवर” राजनेता भावाने केला अत्याचाराचा प्रयत्न
भाजपा तालुका महामंत्री भानेश येग्गेवार ह्याचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे पत्नीकडील जवळच्या नात्यातील १९ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे तालुका महामंत्री भानेश येगेवार यांच्याविरुद्ध गोंडपिपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आरोपीची पत्नी गोंडपिपरी पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. भाजपा पदाधिकाऱ्याने केलेली ही घटना उघडकीस येताच तालुक्यात राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, २१ जून रोजी भंगाराम तळोधी येथील भानेश येगेवार यांच्या शेतात कापूस बियाण्यांची पेरणी सुरू होती. बियाणे संपल्याने ते आणण्यासाठी तक्रारदार महिला आणि भानेश येगेवार हे गावातच राहणाऱ्या सासरच्या नातेवाईकाच्या घरी गेले. त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून, नात्याने बहिण ठरणाऱ्या महिलेला “तुला वर्षभरापासून मूलबाळ होत नाही, मी तुला मूलबाळ करून देतो,” असे म्हणत खाटेवर पाडून अश्लील शारीरिक स्पर्श करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महिलेने आरडाओरड केल्यानंतर अखेरीस भीतीपोटी आरोपी घटनास्थळावरून पसार झाला मात्र जाण्यापूर्वी घटनेबाबत कुणाला काही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी पीडितेला दिली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित महिलेला मराठी भाषा अवगत नसल्याने तिला तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि पाहुण्यांच्या मदतीने अखेर २७ जून शनिवारी रोजी तिने गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत गोंडपिपरीचे पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ७४, ७५ व ३५१(२) अन्वये भानेश पोचू येगेवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.



