ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया – आ. किशोर जोरगेवार

पालेवार भोई समाज, चंद्रपूर यांच्या वतीने गुणवंत सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण हेच यशाचे सर्वात प्रभावी साधन आहे. कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

पालेवार भोई समाज, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित गुणवंत सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला. सन २०२६ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेत ६० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच नीट, एमपीएससी, यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून शासकीय सेवेत रुजू झालेल्या गुणवंतांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, तुषार सोम, नगरसेवक भालचंद्र दानव, दशरथसिंह ठाकूर, किरण कोतपल्लीवार, अजय कोतपल्लीवार, अभय बडकेलवार, राजेंद्र गर्गेलवार आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प आपण घेतला आहे. प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला उच्च दर्जाचे शिक्षण देण्याच्या उद्देशातून आपण ‘अम्मा की पढाई’ हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमांतर्गत २८४ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे निःशुल्क शिक्षण दिले जात आहे. या शिक्षण केंद्रातील अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीत रुजू झाले असल्याचे ते यावेळी म्हणाले. चंद्रपूर मतदारसंघात विविध ठिकाणी आपण अभ्यासिका उभारत असून भोई समाजालाही अभ्यासिका उभारण्यासाठी निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. डॉक्टर, अभियंता, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रांमध्ये समाजातील युवकांनी पुढे येऊन नेतृत्व करावे. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थी व पालकांना करिअरविषयक मार्गदर्शन करून विविध क्षेत्रांतील संधींबाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला पालेवार भोई समाजातील मोठ्या संख्येने समाजबांधव, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये