झरण वनपरिक्षेत्रात आढळला मृतावस्थेतील मादी रानगवा
अती उष्ण तापमानामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने नागरिकांसह वन्यजीवांनाही तीव्र उष्णतेचा फटका बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. झरन वनपरिक्षेत्रातील आकसापूर उपक्षेत्रातील भटाळी मार्गालगत कक्ष क्रमांक ११७ मध्ये प्रौढ मादी रानगवा ६ जून रोजी मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गावकऱ्यांना रस्त्यालगत रानगवा मृतावस्थेत दिसून आल्यानंतर त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. तसेच हॅबीटॅट काँझरवेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली.माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा व प्राथमिक तपासणी केली.
मृत रानगवा रस्त्यालगत आढळल्याने सुरुवातीला वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा अथवा अपघाताची चिन्हे आढळून न आल्याने हा अंदाज चुकीचा ठरला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता लेणगुरे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळीच शव विच्छेदन केले असून प्रथमदर्शनी उष्माघातामुळे रानगव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झरन वनपरिक्षेत्रात मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यजीवांना गावाकडे भटकंती करण्याची वेळ येत नाही. संबंधित परिसर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३_बी लगत असून कन्हाळगाव अभयारण्याच्या सीमेलगत आहे. हा भाग कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य आणि ताडोबा_अंधारी व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा महत्वाचा वन्यजीव भ्रमणमार्ग असल्याने येथे वन्यप्राण्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
तज्ज्ञांच्या मते, रानगवे फूट अँड माउथ डिसीज, परजीवी आणि गोचीडजन्य आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. तथापि, प्राथमिक तपासणीत अशा संसर्गजन्य आजारांची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. तरीही मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, काही वर्षापूर्वी नवेगाव_नागझिरा व्याघ्र प्रकल्पात फूट अँड माऊथ डिसीजच्या संसर्गामुळे सुमारे २५ गव्याचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाने या प्रकरणातही खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक दक्षता घेतली आहे.
घटनास्थळी वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी. मडावी यांच्यासह पथकात एस. के. पंधरे, ए. एन. घुगलोत, पी. वी. कर्णेवाड तसेच हॉबीटेट काँझरवेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, नाजीश अली, प्रसाद चट्टे आणि वनविकास महामंडळाचे वनमजूर उपस्थित होते.



