पावसाळा तोंडावर, आचारसंहिता तात्काळ रद्द करून विकासकामांना गती द्या : खा. धानोरकर
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक अविरोध झाल्याने निवडणूक आयोगाकडे आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक पूर्णपणे अविरोध झाली आहे. त्यामुळे आता संबंधित मतदारसंघांतील निवडणूक आचारसंहिता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
नुकतीच या विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली होती आणि त्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रांत आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत ही निवडणूक पूर्णपणे अविरोध झाली आहे. निवडणूक अविरोध झाल्यामुळे आता या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान किंवा इतर कोणतीही निवडणूक प्रक्रिया पार पडणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधताना म्हटले आहे की, “निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे, प्रशासकीय निर्णय आणि जनकल्याणाच्या योजना थांबलेल्या आहेत. सध्या पावसाळा तोंडावर असून पूर नियंत्रण, रस्ते दुरुस्ती, शेतीविषयक कामे आणि इतर स्थानिक विकासकामांना गती देणे अत्यंत आवश्यक आहे.”
निवडणूकच अविरोध झाल्याने आचारसंहिता पुढे चालू ठेवल्यास केवळ विकासकामांना नाहक विलंब होईल आणि सर्वसामान्य जनतेला अडचणींचा सामना करावा लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. अविरोध निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली असल्याने, जनहित आणि विकासकामांची निकड लक्षात घेता निवडणूक आयोगाने सकारात्मक निर्णय घेऊन आचारसंहिता तात्काळ रद्द करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.



